सामान्य माणसाने दिला ग्राहक न्यायालयाच्या माध्यमातुन फेसबुकला दणका !

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आपल्याविरुद्ध होत असलेल्या अन्यायाविरोधात सामान्य नागरिकाने लढण्याचा निर्धार केल्यास काय होऊ शकते, याचे उत्तमोत्तम उदाहरण गोंदिया जिल्ह्यातील एका व्यक्तीने जगाला दाखवून दिले आहे. आॅनलाईन फसवणूक झाल्यानंतर या व्यक्तीने न्यायासाठी भांडून मेटा व फेसबुक या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांना जबरदस्त हादरा दिला आहे. ग्राहक न्यायालयाने फटका दिल्यानंतर या कंपन्यांना स्वत:ची बाजू सावरण्यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घ्यावी लागली आहे. त्रिभुवन भोंगाडे (रा. उमरी, ता. तिरोडा) असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. ते फेसबुकचे सदस्य असून नियमित फेसबुक वापरत असतात. १६ सप्टेंबर २०२० रोजी त्यांना फेसबुक वॉलवर मारिया स्टुडिओची व्यावसायिक जाहिरात दिसली होती. त्या जाहिरातीमध्ये एका प्रसिध्द कंपनीचे जोडे ५९९ रुपयांत उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले होते. भोंगाडे यांनी ते जोडे खरेदी करण्यासाठी डेबिट कार्डद्वारे रक्कम जमा केली, परंतु त्यानंतर त्यांना जोड पाठविण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांनी पैसे परत घेण्यासाठी मारिया स्टुडिओचा कस्टमर केयर नंबर मिळवून त्यावर संपर्क साधला.

दरम्यान, पुढील आरोपीने पैसे परत करण्याचे आमिष दाखवून भोंगाडे यांच्या खात्यातून ६ हजार ९६९ रुपये काढून घेतले. या झालेल्या फसवणुकीबाबत भोंगाडे यांनी द्विटर, फेसबुक इत्यादी माध्यमातून तक्रारी करून न्याय मागितला. पण मेटा व फेसबुक या दोन्ही कंपन्यांनी त्यांची दखल घेतली नाही. त्यानंतर भोंगाडे यांनी गोंदिया जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली. ग्राहक आयोगाने भोंगाडे यांचे ५९९ रुपये परत करण्याचे, तसेच त्यांना शारीरिक-मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी २५ हजार रुपये भरपाई म्हणून अदा करण्याचे आदेश फेसबुक इंडिया आॅनलाईन सर्व्हिसेस कंपनी व मेटा प्लॅटफॉर्म्स यांना दिले. मात्र, इतर ६ हजार ९६९ रुपये गमावण्यासाठी भोंगाडे स्वत: ही कारणीभूत असल्यामुळे आयोगाने ती रक्कम परत करण्याची मागणी अमान्य केली आहे. आता फेसबुक व मेटा या कंपन्यांनी स्वत:विरुध्दच्या आदेशाला थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण आता न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.