वाढत्या अतिक्रमणामुळे… राष्ट्रीय महामार्गाचे अस्तित्व धोक्यात

साकोली  : मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले असले, तरी सर्व्हिस रोडवर अतिक्रमण होऊन त्याची दुरावस्था झाली आहे. व्यावसायिकांनी अनेक ठिकाणी दुभाजक तोडले असून, अनेक ठिकाणी महामार्ग असुरक्षित केल्याचे दिसत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. या समस्यांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत असून, अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सर्व्हिस रोडची दुरावस्था व अतिक्रमण वाढल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रीय महामार्ग ५३ मृत्यूचा सापळा बनला आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. नागपूर ते रायपूर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम दर्जेदारपणे पूर्ण न झाल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटू शकलेला नाही. भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी वाहतूक व महामार्गावरील सुविधांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अनेकदा निवेदने दिली आहेत. राष्ट्रीय महामार्ग केवळ नाममात्र असून, महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने राष्ट्रीय महामार्गाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र आहे.

सध्या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहनांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुसळधार पावसामुळे महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघातही होत आहेत. योग्य उताराअभावी पावसाचे पाणी महामार्गावरून वाहून जाऊ शकत नाही. त्यामुळे अपघातांनाही आमंत्रण मिळत आहे. मुख्य महामार्गावरील वाहतूक वाढल्याने व महामार्गावरील गावांतील लोकसंख्या वाढत असल्याने महामार्गावर लोकांची गर्दी वाढत आहे. पादचारी तसेच स्थानिक वाहनचालक जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडताना दिसत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सूचना फलक, साइन बोर्ड, बॅरिकेड्स, ग्रील्स, सिग्नल आदी उपाययोजना नसल्यामुळे वाहने चालवताना धोका वाढला आहे. पावसाळ्यात महामार्गावरील खड्डे व मार्गदर्शक सूचनांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गाडी चालवताना हाच त्रास होतोच. महामार्गावर पडलेले खड्डे दुरुस्त करण्यासाठी प्राधिकरणाचे अधिकारी, ठेकेदार व कंपनीच्या अधिकाºयांना जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी कळविण्यात येते, मात्र संबंधितांच्या दुर्लक्षामुळे महामार्गाची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे वाहनचालकांना अपघातात जीव गमवावा लागतो किंवा अपंगत्व पत्करावे लागते. अधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणामुळे परिस्थिती ‘पूर्वीसारखी’ झाली आहे. काही ठिकाणी महामार्गाचे रुंदीकरणही कमी-अधिक झाले आहे. भंडारा बायपास शिंगोरी ते मूजबी पर्यंत निर्माणाधीन महामार्ग बांधकामात सुरक्षा व्यवस्थेच्या उपाययोजनाकडे संबंधित कंत्राटदार कंपनी द्वारा दुर्लक्ष केल्या जात आहे. लाखनी ते साकोली देवरी या रस्त्यावर मोहघाटा व ससेकरण टेकडी परिसरात अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

वनकायद्यामुळे महामार्ग चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून झाले नव्हते, मात्र या वर्षी चौपदरी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले, रस्त्याचे बांधकाम करताना योग्य ती सुरक्षा व्यवस्था न केल्याने निर्माणाधीन कंपनीच्या दुर्लक्षित नियोजनामुळे अपघातांसह मोठी वाहतूक कोंडी दररोज होत आहे. महामार्ग बांधणीच्या कामात वापरण्यात येत असलेल्या फ्लाय अ‍ॅशच्या धुळीमुळे वाहनचालकांना समोरचे दृश्य दिसत नाही, त्यामुळे अपघातात वाढ होत आहे. महामार्गाची रचना करताना प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी सुरक्षिततेच्या साध्या मुद्दयांकडे दुर्लक्ष कसे केले जाते? बांधकाम संस्था किंवा सल्लागार यांच्यात नीधी उधळपट्टीची रचना आहे का? भंडारा, लाखनी, साकोली, सडक अर्जुनी, देवरी, तालुक्यातून जाणाºया या राष्ट्रीय महामार्गावर वाहने संवेदनशील ठिकाणी उभी करून अवैधरित्या थांबे घेत आहेत. अवजड वाहने आणि आॅटोचे चालक खासगी प्रवासी उचलण्यासाठी रस्त्यावरच वाहने उभी करतात. कधी कधी एस.टी. बसचालकांकडूनही अनधिकृत थांब्यांचा वापर केला जात आहे. अनेकवेळा महामार्गावर वाहनांच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी मध्यभागी येतात. अशा वेळी अनधिकृत थांब्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांना जीव गमवावा लागतो.

राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला पेट्रोलपंप, मंगल कार्यालय, ढाबा, बियर बार रेस्टॉरंट, व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण अपघातांना निमंत्रण देत आहे. महामार्गावरील ग्राम शिंगोरी येथील चौक मानेगाव सडक, विर्शी फाटा, इत्यादी ठिकाणी अपघातांना ब्लॅक स्पॉट ठरत आहेत. नागपूर ते देवरी या राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी अंदाजे १७५ किरकोळ व मोठ्या अपघातात सुमारे ७० जणांचा मृत्यू होतो, तर सुमारे ६५ जण गंभीर जखमी व अपंग झाल्याची नोंद वर्तवली जाते. नागपूर ते जबलपूर रस्त्यावरील वनपरिक्षेत्रातील महामार्गावर ध्वनिरोधक पूल बांधण्यात आला असून, त्यामुळे वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. त्याच धर्तीवर साकोली तालुक्यातील मोहघाटा वन क्षेत्रातील मार्ग व देवरी तालुक्यातील ससेकरण टेकडी वन क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गावर ध्वनी रोधक पूल बांधण्यात यावे अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे. टोलमध्ये दरवर्षी वाढ होत असताना महामार्गाच्या कामात होत असलेल्या गडबडीमुळे अपघात होत आहेत. दरवर्षी अनेक वाहनचालक निष्पाप लोकांचा जीव घेत आहेत.

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संवेदनशील कार्यप्रणालीमुळे लाखनी व साकोली शहरात उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. भंडारा शहराची वाहतूक व्यवस्था व अपघाताचे प्रमाण लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच बायपास मार्ग व वैनगंगा नदीवर नवीन पूलाच्या निर्मितीला मंजुरी दिली असून त्याचे निर्माण कार्य सुरू झाले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *