मूर्ती विमानतळासाठी सर्व मंजुºया तीन महिन्यात मिळवा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : मूल तालुक्यातील मूर्ती विमानतळ देशाच्या संरक्षण दलाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या विमानतळाचे काम रखडल्यामुळे जिल्ह्यात येणारी जवळपास १० हजार कोटींची गुंतवणूक मागे पडली. या गुंतवणुकीमुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती. मात्र आता रखडलेले काम विमानाच्याच गतीने पुढे गेले पाहिजे. सर्व परवानग्या तीन महिन्यात म्हणजे २४ डिसेंबर २०२२ पर्यंत मिळाल्याच पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे, हे अधिका-यांनीच ठरवावे. यापुढे कोणतेही कारण ऐकूण घेतले जाणार नाही, असे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिका-यांना खडसावले.

नियोजन सभागृहात विमानतळाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपश्याम, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, ताडोबाचे क्षेत्र संचालक श्री. रामगावकर, बफर झोनचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद, मध्यचांदाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, ब्रम्हपूरीचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, देवराव भोंगळे आदी उपस्थित होते. बैठकीच्या आजच्या दिवसापासून पुढील तीन महिने म्हणजे २४ डिसेंबर२०२२ ही परवानग्या मिळण्याची अंतिम तारीख आहे, हे अधिका-यांनी लक्षात ठेवावे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात वेळेत विमानतळ झाले असते तर १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असती. याबाबत प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांच्याशी बोलणेसुध्दा झाले होते. यातून जिल्ह्यातील किमान १० ते १५ हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला असता. मात्र यापुढे कोणतेही कारण ऐकूण घेणार नाही. विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून १५ आॅगस्ट २०२३ पर्यंत त्याचे लोकार्पणकरण्याचा आपला मानस आहे. त्या दृष्टीने संबंधित अधिका-यांनी कामाचे नियोजन करून रोज पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *