ताडोबा बफर झोनमध्ये वाघिणीचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंद्रपूर (बफर) वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र वरवट कक्ष क्रमांक ३८६ मध्ये (टी-६४) वाघिणीचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. साधारणत: ८ ते १० दिवसांपूर्वी या वाघिणीचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दोन महिन्यांत सात वाघांचा मृत्यू झाला आहे. ताडोबा बफरअंतर्गत वन कर्मचारी गस्तीवर असताना रविवारी सायंकाळच्या सुमारास वाघिण मृतदेह मिळाला. वाघिणीचे सर्व अवयव शाबुत असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती ताडोबा बफरचे उपवन संरक्षक कुशाग्र पाठक यांना देण्यात आली.

घटनास्थळावर कुशाग्र पाठक, सहायक वनसंरक्षक बी. सी. येळे, एनटीसीए प्रतिनिधी तथा इकोप्रो अध्यक्ष बंडू धोतरे, पीसीसीएफ प्रतिनीधी मुकेश भांदकर यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. ६ मार्चला मृत वाघिणीचे चंद्रपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर आवश्यक नमुने घेऊन दहन करण्यात आले. मृत वाघिणीचे वय ९ ते १० वर्ष आहे. याप्रसंगी वनपरीक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार, डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ. बावणे आदी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रभरात आठ वाघांचा मृत्यू झाला असून, त्यातील ७ वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच रविवारी पुन्हा एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *