नक्षलवाद्यांची ३० नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हा बंदची हाक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त तोडगट्टा येथे खाणींविरोधात सुरू असलेले आंदोलन पोलिसांसोबत झालेल्या वादानंतर उधळण्यात आले. यावरून आता नक्षलवादी आक्रमक झाले आहेत. माओवादी संघटनेचा पश्चिम सबजोनल प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रक जारी करून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्याच्या मागणीसाठी ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा बंदची हाकही दिली आहे. दोन वर्षांपूर्वी सुरजागड येथे लोहखाण उत्खनन सुरू झाले. आता एटापल्ली तालुक्यात आणखी सहा लोहखाणी प्रस्तावित आहेत. यास विरोध करत मागील अडीचशे दिवसांपासून दमकोंडवाही खाणविरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली परिसरातील नागरिकांचे तोडगट्टा येथे आंदोलन सुरू होते. २० नोव्हेंबरला आंदोलनस्थळापासून जवळच वांगेतुरी येथे पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शंभर पोलिसांचे पथक परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना आंदोलक व पोलिसांमध्ये वाद झाला. आंदोलकांनी धक्काबुक्की करत वांगेतुरीला जाण्यापासून रोखल्यानंतर पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत काही आंदोलक नेत्यांना ताब्यात घेतले. यानंतर आंदोलक पांगले तेथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, तोडगट्टा येथील आंदोलनकर्त्यांच्या अटकेवरून माओवादी संघटनेचा प्रवक्ता श्रीनिवास याने दोन पानी पत्रक जारी केले आहे. विकसित भारत यात्रेचा उद्देश मूळनिवासींचे अस्तित्व संपविणे व कॉर्पोरेट घराण्यांचा विकास करणे हा असल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. झारखंडमध्ये कोळसा खाणींविरोधात आदिवासी लढत आहेत. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्थानिकांनी विरोध केला, तेव्हा पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावी केली, असा आरोप या पत्रकात केला आहे. वांगेतुरी येथील पोलीस मदत केंद्र हटवा, आंदोलकांची सुटका करा, या मागणीसाठी ३० नोव्हेंबरला जिल्हा बंदची हाक दिली असून ग्रामसभांनाही गावागावात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन केले आहे. श्रीनिवास याने या पत्रकात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनाही आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी देखील केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *