अहिंसा व एकात्मतेसाठी धावली जिल्ह्यातील तरूणाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : बिरसा मुंडा जयंती निमित्त गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित अहिंसा दौडला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असून थंडीच्या साक्षीने अहिंसा व एकात्मतेसाठी जिल्ह्यातील तरूणाई स्वयंस्फूर्तीने धावली. जिल्हा क्रीडा संकुलाचे भव्य मैदान युवक युवतींनी फुलून गेले होते. तीन टप्प्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत २१ किमी पुरुष गट लीलाराम बावणे, महिला गट सुषमा रहांगडाले, १० किमी पुरुष गट निखार भलावी, महिला गट सोनिया लिल्हारे व ३ किमी रन अँड वॉक पुरुष गट नागेश देवकर व महिला गटात पूजा येडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय कमी वेळेत या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. अहिंसा दौड स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते सकाळी पाच वाजता करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र जयरामेगौडा आर., सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी अनमोल सागर, मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्हि. कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर सबलांचे प्रतिक असून ‘अहिंसा परमो धर्म’ आहे. या विषयाच्या अनुषंगाने अहिंसा दौड ही महत्वपूर्ण पाऊल आहे. या भव्य व नियोजनबद्ध आयोजनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस दल अभिनंदनास पात्र आहे, असे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले. तर या स्पधेर्तून अहिंसा व एकात्मता हे महत्वाचे संदेश देणारी ही दौड असून हाच व्यापक संदेश स्पर्धक या ठिकाणाहून घेऊन जातील अशी अपेक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखेडे यांनी व्यक्त केली. जिल्हा पोलीस दलातर्फे क्रीडा संकुल, मरारटोली, गोंदिया येथे १८ वर्षावरील युवक- युवतीकरीता २१ कि.मी. हाफ मॅरेथॉन, १६ वर्षावरील युवक-युवतीकरीता १० कि. मी. मॅरेथॉन व आमंत्रित अतिथीकरीता ३ कि.मी. रन अँड वॉक या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी हिरवी झेंडी (फ्लॅग आॅफ) दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. पोलीस दलाने स्पर्धेचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले. सकाळी ५.३० ला सुरू झालेली दौड शहरातील मुख्य मार्गाने मार्ग क्रमण करून क्रीडा संकुलात या दौडचा समारोप झाला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *