‘त्या’ अपघातानंतर प्रशासन झाले जागे, रस्त्यावरून काळीपिवळी प्रवासी वाहने गायब

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया-कोहमारा महामार्गावर क्रमांक ७५३ पाटेकुर्रा-भुसारीटोला गावादरम्यान १६ नोव्हेंबर रोजी काळीपिवळी प्रवासी वाहन आणि ट्रक यांच्यात भीषण धडक झाली. यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. ६ प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर सदर मार्गावरील अवैध प्रवासी वाहतूक गायब झाल्याचे चित्र आहे. गत तीन-चार दिवसांपासून रस्त्यांवर काळी-पिवळी प्रवासी वाहने दिसत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये चर्चेला पेव फुटले आहे. पोलिस प्रशासनाने अवैध काळी पिवळी प्रवासी वाहनांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे. कारवाईच्या भीतीने गेल्या तीन दिवसांपासून काळ्यापिवळ्या टॅक्सी रस्त्यावर दिसत नाहीत. काळ्यापिवळ्या टॅक्सीतून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात, हे उल्लेखनीय. मात्र तीन दिवसांपासून प्रवाशांना काळ्यापिवळ्या टॅक्सीची वाट पाहावी लागत आहे. काळ्यापिवळ्या टॅक्सींचा प्रवास किती सु- रक्षित असतो, हे सर्वांना माहीत आहे, मात्र अनेक रस्त्यांवर एसटी प्रवासी बसेसची सेवा नसल्यामुळे प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. याआधीही काळ्यापिवळ्या टॅक्सी चालकांच्या निष्काळजीपणा व बेजबाबदारपणामुळे अनेक अपघात घडले आहेत. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता ट्रक आणि काळीपिवळी टॅक्सी यांच्यात भीषण अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. पोलिस प्रशासन काही दिवस काळ्यापिवळ्या टॅक्सीचालकांवर कारवाई करते, त्यानंतर परिस्थिती जैसे थे होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पोलिस प्रशासनाने काळ्यापिवळ्या टॅक्सीचालकांवर ठोस कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *