जि.प.तील उपविभागीय अभियंता व शाखा अभियंत्याला लाच घेतांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- येथील जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत उप विभागीय अभियंता आणि शाखा अभियंत्याला जल जीवन मिशनचे बिल काढण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्य पथकाने अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. २३) रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. शाखा अभियंत्याचे नाव दामोदर जगन्नाथ वाघमारे आणि उपविभागीय अभियंत्याचे नाव नृपालसिंह अजाबसिंह जतपेले असे आहे. तक्रारदार हा कंत्राटाचा परवाना असलेला कंत्राटदार आहे. त्याने पाणीपुरवठा विभागाच्या गोंदिया उपविभागांतर्गत येणाºया पिंडकेपार ग्रामपंचायतींतर्गत कन्हारटोला आणि पिंडकेपार या गावांत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तीक नळ जोडणीचे काम घेतले होते. २१ एप्रिल २०२२ रोजी कायार्रंभ आदेश मिळाल्यानंतर दोन्ही गावांत नळ जोडण्या पूर्ण केल्या. काम पूर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र देखील उपविभागीय अभियंता यांच्याकडे दिले होते. शाखा अभियंता दामोदर वाघमारे याने तक्रारदाराला १० नोव्हेंबर रोजी कार्यालयात बोलावून बिलावर ग्रामपंचायत सरपच आणि सचिव यांची स्वाक्षरी घेण्याकरिता बिलाची फाईल दिली. तक्रारदाराने १४ नोव्हेंबर रोजी स्वाक्षरी करून ती फाईल वाघामारे यांच्याकडे नेवून दिली. कामाचे ३ लाख ९१ रुपयांचे देयक द्यायचे होते.

एमबी बूकआणि देयकावर स्वाक्षरी करण्याकरिता उपविभागीय अभियंता यांचे दोन टक्के आणि स्वत:करिता तीन टक्केप्रमाणे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. जोपर्यंत पैसे देणार नाही, तोपर्यंत फाईल पुढे सरकणार नसल्याचे सांगितले. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लाच न देता यासंदर्भात गोंदिया येथील लाच लुचपत प्रतीबंधक पथकाकडे तक्रार दाखल केली. पथकाने पडताळणी केल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी उशिरा जिल्हा परिषदेतील तिसºया माळ्यावर असलेल्या पाणीपुरवठा विभागात सापळा रचला. यावेळी आरोपी दामोदार वाघमारे याला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक राहूल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाील पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, सहाय्यक फौजदार विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे, मिलकीराम पटले, संजय बोहरे, संतोश शेंडे, राजेंद्र बिसेन, मंगेश कहालकर, संतोष बोपचे, दीपक बाटबर्वे यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *