उभ्या ट्रकवर आदळले पोलिसांचे वाहन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- अर्जुनी मोरगाव येथून कारवाई करून गोंदियाकडे परत येत असलेले पोलिसांचे खासगी वाहन उभ्या ट्रकवर आदळले. यात एका पोलिस कर्मचाºयाचा जागीच मृत्यू, तर दोन कर्मचारी जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. ७) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास गोंदिया-गोरेगाव रस्त्यावरील ढिमरटोलीजवळ घडली. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस कर्मचारी विजय मानकर (वय ४०, रा. यवतमाळ), असे मृताचे नाव आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपाल कापगते व पोलिस शिपाई तुळशीदास लुटे हे या अपघातात जखमी झाले. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस कर्मचारी तुळशीदास लुटे, विजय मानकर आणि गोपाल कापगते हे खासगी कारने मंगळवारी (ता. ६) अर्जुनी मोरगाव येथे कारवाईसाठी गेले होते. कारवाईनंतर मध्यरात्री उशिरा गोंदियाकडे परत येत असताना ढिमरटोलीजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कारने मागेहून धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कारचा पूर्णत: चेंदामेंदा होऊन पोलिस कर्मचारी विजय मानकर यांचा मृत्यू झाला. सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपाल कापगते व पोलिस शिपाई तुळशीदास लुटे गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. चालकाला झोपेची डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असे बोलले जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *