नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला केन्द्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाने पुढे पाउल टाकत प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. या प्रकल्पाला केन्द्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी प्रदान केली आहे. नागपूर महानगरपालिका हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला. त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी केन्द्रीय मंत्रीमंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास ५०० किमी सिवरलाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येईल.

या प्रकल्पाचा एकूण खर्च १९२७ कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून १११५.२२ कोटी, राज्य शासनाकडून ५०७.३६ कोटी व मनपाकडून १५ टक्के म्हणजे ३०४.४१ कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १३१८६१ घरांना सीवर नेटवर्क मध्ये जोडण्यात येईल. प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेकडून केली जाणार आहे. यासाठी नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे प्रकल्पांतर्गत होणार आहेत. नागपुरकरांसाठी महत्वपूर्ण ठरणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.