समानतेसाठी माविम मित्र म्हणून पुरुषांचा सहभाग महत्वाचा-गौरी दौंदे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महिला आर्थिक विकास महामंडळ हे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत असून बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत राज्यात कामे सुरू असतांनाच महिलांसोबत पुरुषांचाही माविम मित्र म्हणून सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन माविम, मुंबईच्या कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दौंदे यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळ, (माविम) भंडाराच्या वतीने दि. ०८ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२३ रोजी माविम महिला प्रांगण, मोहाडी येथे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यमविकास प्रकल्पांतर्गत पुरुष मास्टर ट्रेनर यांच्याकरिता तीन दिवसीय लिंग समभाव संचेतना कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रशिक्षणात माविम मित्र मंडळातील पुरुष मास्टर ट्रेनर उपस्थित होते. सम्यक – संवाद आणि संसाधन केंद्र, पुणे येथील प्रशिक्षक शेखर चोरघे यांनी स्त्रीपुरुष समानता या विषयावर माहिती देऊन चर्चा घडवून आणली. महिलांना समाजामध्ये आजही दुय्यम स्थान दिले जाते. त्यामुळे महिलांना समान हक्क व संधी मिळावी यासाठी पुरुषांनीसुद्धा पुढाकार घ्यावे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमात माविम, मुंबई येथील कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दौंदे, विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी राजू इंगळे आॅनलाईन गुगल मिटद्वारे उपस्थित होते. तर यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे, लेखाधिकारी मुकुंद देशकर यांच्यासह व्यवस्थापक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *