उत्साही तरूणांचा वाघाने केला पाठलाग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील धोप गावालगत असलेल्या एका शेतात वाघ असल्याची माहिती मिळताच अतिउत्साही तरूणांनी त्या शेताकडे मोर्चा वळविला मात्र वाघाने त्यांचा पाठलाग करताच युवकांनी जीव मुठीत घेवुन पळ काढला . वाघानेही त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. मात्र दैव बलवत्तर म्हणून वाघोबा उलट्या पावली परत गेला.या घटनेमुळे उत्साही तरूणांचा जीव थोड्या वेळेपुरता भांड्यात पडला होता. आज ८ मार्च रोजी मोहाडी तालुक्यातील धूप ताडगाव दरम्यान असलेल्या उमेश सपाटे यांच्या शेतालगत वाघ असल्याची चर्चा आणि वाघाने रानडुकराची शिकार केल्याचे पसरले. साहस दाखवण्याची प्रचंड आवड असलेले काही तरुण हातात लाठ्याकाठ्या घेऊन वाघोबाला पाहायला गेले. तर वाघोबानेही तरुणांना दर्शन दिले.
नुसते दर्शन दिले नाही तर भर शेतात तरुणांचा पाठलाग केला. तरुण आरडा ओरड करून वाघोबाला पळविण्याच्या प्रयत्नात होते तर वाघोबा एखाद्याला तरी आपल्या ताब्यात घेण्याच्या. यातील एक तरुण पळताना शेतात पडला आणि तो वाघोबाच्या तावडीत गेला असे वाटत असताना वाघोबाने आल्या पावली परत जाण्याचा निर्णय घेतला. तरुणाचे नशीब बलवत्त्तर म्हणून वाघ परत गेला आणि पडलेल्या तरुणासह इतरांचा जीवभांड्यात पडला. जर अप्रिय घटना घडली असती तर वाघोबाला पाहण्याचे साहस किती महागात पडले असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या प्रकारानंतर वनविभागाच्या पथकाने येऊन पाहणी केली, पण वाघोबाने त्यांनाही हुलकावणी दिली. वनविभाग आपल्या परीने प्रयत्न करीत आहे मात्र केवळ सर्वसामान्य नागरिकांना दर्शन देऊन निघून जाणारे हे वाघोबा वनविभागाच्या हाती कधी लागणार हा प्रश्नच आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *