गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे मार्गावरील ट्रॅकवर उतरले प्रवाशी तब्बल एक तास थांबविली रेल्वे गाडी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक मागील महिनाभरापासून पूर्णपणे बिघडले आहे. या मार्गावरील पॅसेंजर गाड्या दोन ते तीन तास उशीराने धावत आहे. परिणामी प्रवाशांना याचा फटका बसत आहे. गुरुवारी (दि.२०) सकाळी सुध्दा असा प्रकार घडल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी गोंदियाचांदाफोर्ट मार्गावरील नवेगावबांध रेल्वे स्थानकावरगोंदिया-बल्लारशा पॅसेंजर गाडी पोहचल्यानंतर ट्रॅकवर उतरुन संताप व्यक्त केला. यामुळे नवेगावबांध रेल्वे स्थानकावर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गोंदियाहून सकाळी ७:३० वाजता बल्लारशाकडे जाणारी गोंदिया-बल्लारशा ही गाडी गुरुवारी सकाळी नियोजित वेळी नवेगावबांध रेल्वे स्थानकावर पोहचली. मात्र या रेल्वे स्थानकावरुन ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना न होता याच ठिकाणी १ तास थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहचण्यास विलंब झाला आहे.

मालगाडी पास करण्यासाठी ही प्रवासी गाडी तब्बल तासभर या रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवल्याची माहिती आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून या मार्गावर हा प्रकार नित्याचाच झाला आहे. यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गाडीतील प्रवाशांनी नवेगावबांध रेल्वे स्थानकावर १ तास गाडी थांबवून ठेवल्याने ट्रॅकवर उतरुन आपला संताप व्यक्त केला. तसेच हा प्रकार त्वरित थांबविण्याची मागणी केली. दरम्यान स्टेशन व्यवस्थापकांनी प्रवाशांची समजूत घातल्यानंतर प्रवासी शांत झाल्याची माहिती आहे.कोरोनापासून रेल्वे प्रशासनाने मालगाड्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. मालगाड्या पास करण्यासाठी प्रवासी गाड्या दीड ते दोन तास थांबवून ठेवल्या जात आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहचण्यास विलंब होत आहे. या प्रकारात मागील आठवडाभरापासून वाढ झाली आहे. आधी हा प्रकार केवळ हावडा-मुंबई मार्गावर होता पण त्याचीच पुनर्रावृत्ती हा गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावर सुरु झाली आहे. मालगाड्यांसाठी प्रवासी गाड्यांना वेठीस धरले जात असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *