विदर्भात पुढचे पाच दिवस गारपीट व अवकाळीचे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : विदर्भात उन्हाळी की पावसाळा हेच कळेना झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले अवकाळीचे सत्र पुढचे पाच दिवस पुन्हा सुरू राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २७ एप्रिलपर्यंत विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण, विजांचे गर्जन व वादळासह गारपीटही होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवस ढगाळ वातावरण राहिल व पुढे परिस्थिती सुधारण्याचा अंदाज आहे. यावर्षी १० एप्रिलपासून काही दिवस उन्हाचे चटके त्रासदायक ठरले होते. दिवसाचा पारा ३९ ते ४१ अंशाच्या आसपास राहिला. १९ एप्रिल रोजी नागपूरचे तापमान ४२ अंशावर गेले, जे या उन्हाळ्यात आतापर्यंत सर्वाधिक होते. विदर्भात चंद्रपूर, ब्रम्हपुरीसह अकोला, वर्धा, वाशिम या शहरांचा पारा ४३ अंशाच्या वर गेला होता. २० एप्रिलपासून अवकाळीचे ढग आकाशात जमा झाले आणि पारा खाली घसरत गेला. रविवारी नागपूरचे कमाल तापमान सर्वाधिक ६ अंशाने घसरत ३५.३ अंशावर आले. त्यामुळे दिवसभर ढगांची गर्दी नसली तरी उन्हाची तीव्र जाणीव झाली नाही.

शनिवारी गारपीटीसह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे रविवारी सकाळी ८.३० वाजता पर्यंत नागपुरात १५.५ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळीही पावसाचे किरकोळ थेंब पडले. त्यानंतर दिवसभर उघडीप दिली. त्यामुळे पावसासह उन्हापासूनही दिलासा मिळाला. शहरात रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा ५.५ अंशाने घसरत १९.४ अंशावर पोहचले. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. नागपूरसह विदर्भातही पाºयाच्या घसरणीचा क्रम सुरू आहे. गोंदियात ५.१ अंशाने घसरत ३५.५ अंश, वर्ध्यात ४.७ अंशाने घसरत ३७ अंश, चंद्रपुरात ३.८ अंशाने घसरत ३८.२ अंश तर अमरावती, अकोल्यात ३.६ व ३.२ अंशाने घसरत ३७ व ३८.३ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. सर्व शहरात रात्रीचा पाराही २ ते ६ अंशापर्यंत घसरत २० ते २२ अंशापर्यंत नोंदविण्यात आला आहे. वादळ व विजांची शक्यता लक्षात घेता नागरिकांना सावधगिरीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *