कंत्राटी नर्सेसचे जि. प. समोर धरणे आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन च्या राज्यव्यापी आवाहनानुसार कंत्राटी एएनएम, जीएनएम व एनएचएम कंत्राटी कर्मचारी यांना भरती प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी शासन सेवेत समायोजन करा या मुख्य मागणीसाठी दिनांक १७ मे २०२३ ला भंडारा जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून समीर कुर्तकोटी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले.                          आंदोलनाचे नेतृत्व युनियनचे जिल्हाध्यक्ष व आयटक चे जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके यांनी केले. २० मार्च २०२३ रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संघटना प्रतिनिधी व उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत कंत्राटी नर्सेस यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली व ३१ मार्च२०२३ पर्यंत मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार शासन सेवेत कायम करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. परंतु अद्याप पर्यंत कोणतेही ठोस निर्णय घेण्यात आले नसल्याने कंत्राटी सेविका व अधिपरिचारिका हवालदिल झाल्या.

परिणामी संघटनेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यस्तरावर ठिकठिकाणी धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात आले व शासनाने त्वरित दखल न घेतल्यास माहे जून मध्ये काम बंद आंदोलन करावे लागेल असेही निवेदनात आवाहन करण्यात आले. शिष्टमंडळात व धरणे आंदोलनात प्रामुख्याने कॉ.हिवराज उके, दीक्षा शेंडे, हेमलता सार्वे, कुमुदिनी अंबादे, पुष्पा सिंग, प्रतिभा पराते, रूपाली वंजारी, सखू राखडे, शालिनी निरगुडकर, नीलिमा निंबार्ते, पुष्पा कांबळे, कॉ. वामनराव चांदेवार, कॉ. राजू लांजेवार इत्यादींचा समावेश होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *