विरलीत अतिक्रमण हटाव मोहीम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर- पवनी मार्गावर येथील काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन येथील ग्रामपंचायतच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. याविषयी येथील अतिक्रमण धारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. शनिवारी लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांनी प्रत्यक्षात अतिक्रमणधारकांच्या भेटी घेऊन अतिक्रमण न काढल्यास येत्या दोन दिवसात बुलडोझर चालणार असल्याचा इशारा दिला. सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात मोठी बाजारपेठ असून, परिसरातील ८-१० गावांचा दररोजचा संबंध येतो.

तसेच या गावातून चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांना जोडणा-या मार्गाची सुरुवात होत असल्याने या गावाला विशेष महत्त्व आले असून, दिवसेंदिवस या गावाचा विस्तार होत आहे. परिणामी, या गावात लघुउद्योग, पानटपरी आणि इतरही व्यवसाय झपाट्याने वाढत आहेत. मात्र, यातील काही व्यावसायिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे निर्मित लाखांदूर-पवनी मार्गावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे, येथे अनेकदा लहानमोठे अपघात घडत असून, वेळप्रसंगी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब येथील ग्रामपंचायत पदाधिकाºयांच्या निदर्शनास आली. त्यामुळे सदर अतिक्रमण काढण्यासंदर्भात येथील ग्रामपंचायततर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला मागणी करण्यात आली होती.

त्यांच्या मागणीची दखल घेत लाखांदूर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे येथे अतिक्रमण हटाव मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे. त्या अंतर्गत येथील सर्व अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायततर्फे दोन नोटिसा बजावण्यात आल्या, तर शनिवारी प्रत्यक्षात लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांनी स्वत: अतिक्रमणधारकांना त्यांचे अतिक्रमण मागे घेण्यासंदर्भात सूचना केली. अन्यथा अतिक्रमणावर बुलडोझर चालणार असल्याची ताकीद दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *