माहिती अधिकारात लेखापरीक्षण अहवालात कोट्यावधीचा गैरप्रकार झाल्याचे उघड

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील नगरपंचायतच्या स्थापनेपासून लेखापरीक्षण अहवालात कोट्यावधीचा गैरप्रकार झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाल्याने संपूर्ण कार्यकाळातील झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा तालुका मोहाडी उपाध्यक्ष जगदीश निमजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आमदार राजू माणिकराव कारेमोरे, डॉ.परिणय फुके यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्राप्त तक्रारीनुसार, नगरविकास विभाग अधिसूचना क्र. एम.यु.एन -२०१४/प्र. क्र.९९ /नवि /१८ दि.१२ फेब्रुवारी २०१५ नुसार ग्रामपंचायत मोहाडी स्थानिक क्षेत्र हे नगरपंचायत मोहाडी मध्ये रूपांतर झालेली असून सन २०१४-१५ ते सन २०१९-२० या सहा वर्षातील झालेल्या लेखा परीक्षणातील प्रलंबित प्रकरण (परिच्छेद) एकूण १५४असून परिच्छेद निकाली काढण्याची कार्यवाही आजपर्यंत करण्यात आलेली नाही. त्यामुळे लेखापरीक्षकाने नगरपंचायत मोहाडीच्या सन २०२०-२१, २०२१-२०२२ वर्षीच्या लेखापरीक्षण अहवालात गंभीर बाब नमूद केलेली आहे.

नगरपंचायत मोहाडीचे सन २०२०-२१, २०२१-२२ चे लेखापरीक्षण अहवाल सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालय भंडारा यांच्या वतीने दि. ७ आॅक्टोबर २०२२ ते दिनांक ७ डिसेंबर २०२२ पर्यंत तपासणी करण्यात आली.

कलम ९ अ- अर्थसंकल्पीय तसेच वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद नसतांना कमी व जादा खर्च करणे, सामान्य रोखवहीतील अखेरची शिल्लक व बँकेतील शिल्लक रकमेचे ताळमेळ न जुळणे, वार्षिक लेख्याचा गोषवारा प्रपत्र ८२ मध्ये तयार करून संचालक नगरपरिषद प्रशासन जिल्हाधिकारी व सहाय्यक संचालक यांचेकडे पाठविण्यात आलेले नाही, सुरक्षा ठेव रकमेचे रोखपुस्तक न ठेवणे तसेच कामाच्या देयकातून सुरक्षा ठेव कपाती बाबत नोंदवही न ठेवणे, सर्वसाधारण रोकडवहीत अनियमितता, बँक खाते व रोख पुस्तकेतील अखेरची शिल्लक रकमेची ताळमेळ न जुळणे, अखर्चित निधी शासन खात्यावर जमा न करणे, शहरातील नाल्या उपसा व मलबा फेकणे या बाबतीत अनियमितता, आरोग्य विभागातील कामगाराकरिता गणवेश खरेदीत अनियमितता, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत माहिती शिक्षण व प्रसार करणेसाठी शहरात विविध ठिकाणी भिंती चित्रे काढून रंगकाम करणे, कचरापेटीतील खरेदी, हातपंप साहित्य दुरुस्ती करणे, महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सिमेंटरस्ते, नाली व त्यावरील बांधकाम, नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते, नाली व त्यावरील कव्हरचे बांधकाम, रस्ता अनुदानातून रस्ता वाहतूक नियंत्रण व्यवस्थेसाठी केलेला खर्च, नागरी घनकचरा नियम २००० च्या प्रभावी अंमलबजावणी.

कलम ९ ब – १४ व्या वित्त आयोग योजनेतून अग्निशमन वाहन खरेदी, १४ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत गांधी वार्ड व नेहरू वार्ड या ठिकाणी विद्युत खांब उभारून विद्युत खांबावर स्ट्रिट लाईन कन्व्हर्शन बसविणे, नगरपंचायत मोहाडी क्षेत्रातील मालमत्ता कर आकारणी बाबत, नगरपंचायत मोहाडी क्षेत्रात वृक्ष सेल्प वॉटरिंग ट्री गार्ड पद्धतीने लावणे, नागरी सुविधा योजनेअंतर्गत बांधकाम, कार्यालयातील संगणकीय कामे करिता कुशल कामगार पुरवठा करणे, कोरोना संक्रमण काळात विविध बाबींवर केलेला खर्च.

कलम ९ क – लेख्यात शिल्लक रक्कम दाखवण्यात आलेली नाही.

कलम ९ ड – खंड अ, ब, क, मध्ये नमूद केलेल्या बाबी व्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या अनुचित किंवा नियमबाह्यबाबी, आस्थापनेवर पदे रिक्त असल्यामुळे नगरपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे, दिव्यांग व्यक्तींना अर्थसहाय्य करणे, प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना, नगरपंचायत लेखा परीक्षकाकडून नगरपंचायतीच्या लेख्याची लेखापरीक्षा करण्यात आलेली नाही, दुहेरी नोंद लेखा पद्धतीने लेखे न ठेवणे, अनाधिकृत मंडप उभारण्याच्या संदर्भात केलेला खर्च, विविध निधीची स्थापना न करणे, वृक्ष प्राधिकरणाची स्थापना न करता नियमबाह्य वृक्ष उपकर वसूल करणे, नगरपंचायतीने केलेली गुंतवणूक, घसारा निधी, शिक्षण व रोजगार हमी उपकर आकारणे, शासन लेखा शीर्षात जन्म, मृत्यू दाखला फी जमा करणे, मालमत्ता कराची थकबाकी वसूल करणे इत्यादी वरील सर्व मुद्द्यांवर अभिलेख लेखापरीक्षणास वरील आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात न आल्याने सदर आक्षेप कायम करण्यात येत आहे. असे अहवालात नमूद केले आहे.

त्यामुळे सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा भंडारा यांनी ‘अस्वीकृर्ती’ प्रमाणपत्र नगरपंचायत मोहाडी यांना किती असून सदर लेखापरीक्षण अहवालात नोंदविलेले गंभीर आक्षेप हे नगरपंचायत मोहाडी सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षासाठी लेखापरीक्षणास सादर केलेल्या अभिलेख व माहितीच्या आधारे नोंदविण्यात आलेले आहेत. तसेच जी माहिती / अभिलेख लेखापरीक्षणास उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्या संबंधातील अनियमीतता / अपहार / अफरातफरीस लेखापरीक्षक जबाबदार राहणार नाहीत. असे प्रमाणित केले असल्याने नगरपंचायत स्थापनेपासून ते आजपर्यंत कोट्यावधीच्या गैरप्रकार झाल्याची दाट शक्यता असल्याने सदर कालावधीची शासनाने सखोल चौकशी करून कार्यवाही करून मोहाडी नगरपंचायतच्या रहिवासीयांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी भाजपा तालुका मोहाडी उपाध्यक्ष जगदीश निमजे यांनी जनतेच्या वतीने संबंधित मंत्रीमहोदयांना केल्याने शासन कोणती कार्यवाही करते याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे, एवढे मात्र नक्की!

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *