स्थानिक संसाधनाच्या वापरातून ग्रामविकास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्थानिक संसाधनांचा वापर करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व महसूल विभाग संयुक्तपणे उपक्रम राबवीत ग्रामविकासाचे मॉडेल निर्माण करेल, असे, प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या शताब्दी महोत्सवी वर्षात विद्यापीठाकडून ‘ग्राम चलो अभियान’ राबविले जात आहे. या अभियानाबाबत कुलगुरू डॉ. चौधरी यांनी भंडारा येथील जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याशी आज चर्चा केली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कुलगुरू डॉ. चौधरी यांना शुभेच्छा दिल्या. शिवाय, विद्यापीठाकडून साजरा केल्या जात असलेल्या शताब्दी महोत्सवी वर्ष निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रम, योजनांकरिता प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी शशीकुमार बोरकर, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोरलीकर, भंडारा कौशल्य विकास विभाग सहाय्यक आयुक्त सुधाकर झलके, जे. एम. पटेलमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे आदी उपस्थित होते. बैठकीला मार्गदर्शन करीत असताना कुलगुरू डॉ. चौधरी यांनी विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याची सविस्तर माहिती यावेळी दिली.

शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच समाजपयोगी संशोधन करण्यावर भर दिला जात आहे. शिक्षण आणि संशोधनासोबतच विद्यापीठ परिक्षेत्रातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून ग्राम चलो अभियान राबविले जात असल्याचे कुलगुरू डॉ. चौधरी यांनी सांगितले. ग्राम चलो अभियानामध्ये गावामध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करीत ग्रामविकास साध्य करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधनावर आधारित सर्वांगीण विकास साधण्याकरिता संयुक्तिक उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्र व राज्य सरकारकडून अनेक लोकोपयोगी, समाजासाठी कल्याणकारी असलेल्या योजना राबविल्या जातात. विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थी या शासकीय योजनांमध्ये भागीदारी देत सर्वांगीण विकासाकरिता योगदान देणार आहे.

शिवाय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासकीय योजनांचे नियोजन आणि मूल्यांकन देखील केले जाणार असल्याचे कुलगुरू म्हणाले. या सोबतच जिल्हा विकास आराखडा शासकीय योजनांचे मूल्यांकन आणि फलश्रुती, शाश्वत विकासाच्या ध्येयाचे मूल्यांकन, रोजगार हमी अंतर्गत आदर्श गाव निर्मिती, पर्यटन स्थळ विकास आराखडा तयार करणे. मत्स्य पालनव शेतीसंबंधी स्थानिक नागरिकांमध्ये क्षमता निर्माण कार्यक्रम राबविणे. ग्राम समृद्धी योजना, जलशक्ती उपक्रम, पर्यटन व कृषी पर्यटन, जल -जमीन -जंगले, रेशीम उद्योग, फळे- भाजीपाला प्रक्रिया आणि विपणन, कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण स्वयंरोजगार, स्थानिक संस्कृती जतन, स्थानिक खेळ, क्रीडा जतन, मतदार नोंदणी कार्यक्रम आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी महसूल विभागातील अन्य अधिकारी देखील उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *