एकाचे निलंबन, आठ जणांना नोटीस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आमगाव : नुकत्याच पार पडलेल्या आमगाव व अजुर्नी मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्ष विरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी एकाचे निलंबन व आठ जणांना कारणे द्या नोटीस बजावली. नुकत्याच पार पडलेल्या आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या पॅनल विरोधात विरोधी पक्षाच्या पॅनलचे नेतृत्व करणारे यशवंत मानकर यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कार्यवाही करीत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षाकरिता तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे.

तसेच पक्षाच्या पॅनल विरोधात निवडणूक लढणारे विद्यासागर पारधी, हुकूम बोहरे, धनीराम मटाले, बेनीराम पाथोडे ,उमादेवी बिसेन आणि पक्ष विरोधी प्रचार मोहिमेत सहभागी असलेले सेवकराम ब्राह्मणकर, नीलकंठ बिसेन यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष केशवराव मानकर यांनी दिली. २८ एप्रिल रोजी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा व राका यांची युती होती. या दोन्ही पक्षांनी आमगाव विकास पॅनल स्थापन करून १८ पैकी १४ जागा जिंकून आणल्या.

तर काँग्रेस समर्पित किसान विकास परिवर्तन पॅनलला मात्र चार जागांवर समाधान मानावे लागले. मात्र या निवडणुकीत यशवंत मानकर यांनी किसान विकास परिवर्तन पॅनलचे नेतृत्व करून काँग्रेस पक्षाचे मनोबल वाढवीत भाजपच्या उमेदवारास पराभूत करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे अजुर्नी मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाच्या निवडणुकीत प्रदीप मस्के यांनी पक्षाचा आदेश झुगारून प्रतिस्पध्यार्ला मतदान केल्याचा ठपका ठेवत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी शिस्तीचे पालन करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.