‘तो’ एजंट निघाला भाजीविक्रेता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी येथील एका महिला परीक्षार्थीच्या नव-याला फोन करून कोतवाल भरती परीक्षेच्या निकालात नाव पुढे करून देण्याचे आमिष देणा-या एका एजंटची आॅडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. त्याबाबत काही वृत्तपत्रामध्ये बातम्यासुध्दा प्रकाशित झाल्या होत्या. त्यामुळे या सगळया प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. गोबरवाही पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या एजंटला शोधून काढले.मात्र तो एजंट नसून भाजीविक्रेता असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.लग्नाकरीता पैशाची गरज असल्याने त्याने हि शक्कल लढविल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. प्रदीप कुलपे असे या भाजीविक्रेत्याचे नाव असून सुनील अत्रे याच्या मोबाईलवरून कॉल करून त्याने दहाट यांना पैशांचीमागणी केल्याचे कबूल केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, सुनील अत्रे आणि प्रवीण कुलपे, (२६) हे दोघेही वरठी येथील रहिवासी असून ते शेजारी राहतात. प्रवीण याचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. एकदा तो तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे भाजीपाला आणि बकरी खरेदीसाठी गेलेला होता. तेथे त्याच्या मावस भावासोबत बोलत असताना नाकाडोंगरी येथील विपुल दहाट यांची पत्नी कोतवाल भरतीची परीक्षा देत असल्याचे त्याला कळले. १६ मे रोजी प्रवीणचे लग्न असल्याने त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने पैशांचा जुगाड करण्यासाठी एक युक्ती लढवली. त्याने सुनील अत्रे याच्या मोबाईलवरून दहाट यांना कॉल करून त्याच्या पत्नीला कोतवाल भरती परीक्षेत नाव पुढे करून देण्याचे आमिष दाखवले.

त्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. प्रवीणला वाटले की निकाल लागल्यावर जर योगायोगाने दहाट यांची पत्नी पास झाली तर ‘माझ्यामुळे झाले’ असे म्हणून विपुलकडून ५० हजार रुपये घेता येतील, अशी शक्कल लढवून प्रवीण याने फेक कॉल केला, मात्र त्याच्या जाळ्यात तोच अडकला. पोलिसांना दिलेल्या बयाणात त्याने चूक केल्याचे मान्य केले असून केवळ पैशांची गरज असल्यामुळे असे पाऊल उचलल्याचेही सांगितले. या प्रकरणाचा तपास गोबरवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन मदनकर करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *