गोंदियात विक्रमी पाऊस ; सात तालुक्यात अतिवृष्टी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : दोन आठवडे उशिरा हजेरी लावलेल्या मोसमी पासवाने जून महिन्यातील सारेच विक्रम मोडले आहे. गत २४ तासांत जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसासाठी आसुसलेला शेतकरी सुखावला असला तरी पेरणीसाठी पावसाने उसंत देणे आवश्यक आहे. आज दुस-या दिवसीही संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नदी, नाले, तलावातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे २ वक्रदार ०.३० मीटरने उघडण्यात आले असून १५९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी, नाले व सखल भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसाने प्रशासनाची मात्र पोल खोल केली. सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस आज मंगळवारीही सुरू होता.

जिल्ह्यात जून महिन्यातील विक्रमी १०७.८ मिमी पावसाची नोंद आज झाली. गोंदिया तालुका वगळता सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली. गोंदिया तालुक्यात ५७.६ मिमी पाऊस नोंदला गेला. आमगाव १०६.१ मिमी, तिरोडा ७३ मिमी, गोरेगाव ९३.१ मिमी, सालेकसा १२७.४ मिमी, अर्जुनी मोर तालुक्यात सर्वाधिक १५३.६ मिमी पाऊस झाला. देवरी १४९ मिमी, सडक अर्जुनी तालुक्यात१२४ मिमी पाऊस नोंदला गेला. दोन दिवसात झालेल्या पावसाने गत वषीर्ची सरासरी ओलांडली आहे. मागील वर्षी याच कालावधीत १३८.८ मिमी पाऊस बरसला होता. यंदा १ ते २४ जून या कालावधीत केवळ १७ मिमी पावसाची नोंद होती. तीन दिवसात १३० मिमी पाऊस कोसळलाआजपर्यंत जिल्ह्यात १४७.६ मिमी पाऊस झाला असून टक्केवारी ८५.१ आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आजपर्यंत ५ टक्के पाऊस अधिक बरसला.

धान पेरणी खोळंबली

यंदाच्या मोसमात रोहिणी व मृग नक्षत्र कोरडेच गेले. आद्रा नक्षत्रलागताच पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २.४० लाख लागवड क्षेत्राच्या १.८० लाख हेक्टर क्षेत्रात धान पीकाची तर उर्वरीत क्षेत्रात मका, तूर, मूग, उडीद, तीळ, पपई, ऊस, आले, हळद, भाजीपाल्याची लागवड केली जाणार आहे. धान लागवडीसाठी शेतकरी धान नर्सरी तयार करतात. मात्र सुरवातीला अपेक्षीत पाऊस झाला नसल्याने शेतकºयांनी पेरणीच केली नाही.

आता जमीनीत मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने नर्सरी कशी टाकावी या विवंचनेत जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. पुन्हा ३ दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परिणामी जिल्ह्यात पेरणी खोळंबली आहे. कृषी विभागाकडून प्राप्त अहवालात जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ०.२१ टक्केच पेरणीची नोंद आहे.

विदर्भात सर्वदुर पावसाची हजेरी

चार दिवसांपूर्वी सक्रिय झालेल्या पावसाने आता जोर धरला आहे. नागपुरात जोरात नसला तरी संथपणे रिमझिम सुरू आहे. मात्र भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी रात्री धुवांधार बरसात झाली. भंडारा जिल्ह्याच्या साकोलीत १२ तासात तब्बल २०२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे या भागातील नदी, नाले, तलाव तुडूंब भरले आहेत. नागपुरात रात्री १२ तासात १२.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात कुही तालुक्यात सर्वाधिक ४६.४ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाची रिपरिप मंगळवारी दिवसभरही चालली आहे. पावसाचा सर्वाधिक जोर भंडारा जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा कहर सुरू आहे. साकोली तालुक्याला पावसाने धो-धो धुतले. दुसरीकडे पवनी, लाखांदूर, लाखनी, तुमसर तालुक्यातही पावसाने थैमान घातले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरीमध्ये पावसाने धुवांधार बॅटिंग केली. रात्रभरात तब्बल ९१.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात १३६.७ मि.मी. पाऊस झाला. अकोला व अमरावतीतही पावसाची रिमझिम चालली आहे.

नाल्याच्या पुरात एकजण सायकलसह वाहून गेला

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील अरततोंडी ते पिंपळगाव खांबी दरम्यानच्या नाल्यावरील पुलावरून मंगळवारी सकाळी एक अनोळखी व्यक्ती सायकलसह वाहून गेल्याची घटना घडली. सोमवारी सायंकाळपासून तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. अद्याप शोधमोहीम सुरू आहे. त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रशासनातर्फे आजूबाजूच्या गावात दवंडी देण्यात आली आहे.सोमवारपासून तालुक्यात दमदार पर्जन्यवृष्टी होत आहे. गेल्या २४ तासात सुमारे १५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने नाले भरून वाहत आहेत. पिंपळगाव/खांबीच्या नाल्यावरून सोमवारी रात्रीपासून पाणी वाहून जात आहे. मंगळवारी सकाळी हा व्यक्ती सायकल घेऊन नाल्यातून रस्ता पार करत होता. प्रवाह अधिक असल्याने तो नाल्यात वाहून गेला. काही प्रत्यक्षदर्शींनी याचे व्हिडीओ सोशल मीडियावर घातले आहेत. तलाठी सुरेश हरिणखेडे यांनी या दुर्घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना दिली. तहसीलदारांनी घटनास्थळी भेट दिली. हरिणखेडे ग्रामस्थांसोबत शोधमोहीम करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *