वर्ग १ ते ४, मात्र शिक्षक एकच…

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : एकीकडे शासन स्तरावरून शिक्षणासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात असला तरी काही शाळेत पुरेश्या शिक्षकांअभावी शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे . तालुक्यातील नांदेड येथील जिल्हा परिषद प्राथ.शाळेत वर्ग १ ते ४ असले तरी शिक्षक मात्र एकच असल्याने या चारही वगार्चा भार एकाच शिक्षकावर पडत आहे. त्यामुळे, येथे विद्याथीर्संख्येनुसार कायमस्वरूपी शिक्षक देण्याची मागणी केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील नांदेड या गावात इयत्ता १ ते ४ करिता जीप.प्राथ.शाळा ही एकमेवसरकारी शाळा आहे. या शाळेत चारही वर्ग मिळून एकूण ५५ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवितात. मात्र, या वर्षी मार्च महिन्यापासून येथे मात्र एका शिक्षकावर चारही वगार्चा भार आला आहे.

विशेष म्हणजे,४ वगार्साठी एकमेव शिक्षक असल्याने त्या शिक्षकाला नाईलाजास्तव सर्व विद्यार्थ्यांना घेवून एकच वर्ग भरवावा लागत असल्याची वास्तविकता येथे आहे. मार्च २०२३ आधी येथे २ शिक्षक कार्यरत होते. तर गत २ वर्षा आधी येथे पटसंखेनुसार 3 शिक्षक कार्यरत होते. त्या वेळात पुरेशा शिक्षकांमुळे या शाळेची ख्याती असल्याने गावातील एकही विद्यार्थी शिक्षणासाठी गावाबाहेर जात नव्हते. उलट लगतच्या दोनाड येथील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. येथे पुरेशा शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखोळंबा होत असल्याने येथे कायमस्वरूपी शिक्षकाची मागणी येथील सरपंच अरुण बावनकर तथा ग्रामस्थांकडून केली जात आहे.

मुलांचे शिक्षण महत्त्वाचे

सर्वशिक्षा अभियान, शाळाबाह्य शोधमोहीम, सरल प्रणालिसारखे विविध उपक्रमांतून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे दाखवीत असले तरी प्रत्यक्षात शिक्षकभरती होत नसल्याने शाळेत पुरेश्या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नांदेड येथील जीप शाळेत किमान २ पूर्णवेळ शिक्षक द्यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता तसेच शाळेकरिता कुठलीही मदत भासल्यास मी सदैव तत्पर आहे.

अरुण बावनकर सरपंच ग्रामपंचायत नांदेड

सरपंचाचे विद्यार्थ्यांसह शाळेवरचे प्रेम

४ वर्गासाठी एकमेव शिक्षक असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून एकट्या शिक्षकावर अतिरिक्त भार पडत होता. ही बाब हेरून विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे याकरिता येथील सरपंच अरुण बावनकर तथा ग्रामस्थांच्या पुढाकाराने येथे २ मुली तात्पुरत्या निस्वार्थ सेवा देण्यास तडजोड केली आहे.

तालुक्यातील एक शिक्षकी शाळा

नांदेड येथील जि.प. शाळेतील प्रकार हा एकमेव शाळेत नसून तालुक्यातील १६ शाळा पुरेश्या शिक्षका अभावी एक शिक्षकी शाळा बनल्या आहेत. यामध्ये नांदेडसह मानेगाव, पेंढरी, खैरना, दोनाड, रोहनी, विहिरगाव, सोनेगाव, घोडेझरी, तिरखुरी, मालदा, झरी. चिचाळ, बारव्हा, खोलमारा, खैरी/घर या शाळांचा समावेश आहे. तर, संपूर्ण जिल्ह्यात कमी अधिक ३०० च्या घरात शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती आहे.

एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेचा कार्यभार!

सद्यस्थितीत येथे कार्यरत एकमेव शिक्षक भूषणकुमार मेश्राम हे कर्तव्यदक्ष आणि कृतिशील शिक्षक असले तरी सरल, हजेरी, परिपोष सारखे आॅनलाईन आणि इतर कामांत सुद्धा त्यांना वेळ द्यावा लागतो. मात्र, आॅनलाईन तथा रेकॉर्ड कामात वेळ द्यायचा तर शिकविण्याचे कार्य कधी आणि कसे करायचे? अश्या विवंचनेत ते असतात.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *