पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सद्यस्थितीत राज्यात पूर सदृश परिस्थिती असल्यामुळे अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून कालावधीत पूर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन ताकदीने सज्ज आहे, असे वक्तव्य जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी २५ जुलै रोजी गोंदिया व तिरोडा तालुक्यातील संभाव्य पूर प्रवण गावांची पाहणी दरम्यान केले. जिल्ह्यातील ९६ गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. मान्सून कालावधी सुरु झाला असून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील आठवड्यात गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी पूर प्रवण गावांची भौगोलिक परिस्थिती पाहण्याकरिता गोंदिया तालुक्यातील कोरणी घाट, रजेगाव, बिरसोला, कासा, काटी, पुजारीटोला व तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा, किडंगीपार, ढिवरटोला या गावांना भेट देवून स्थानिक लोकांशी संवाद साधला. यावर्षी करण्यात आलेले पूर परिस्थितीचे नियोजन व भौगोलिक परिस्थितीचीही त्यांनी पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत तहसिलदार गोंदिया समशेर पठाण, तहसिलदार तिरोडा गजानन कोकाड्डे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, कार्यकारी अभियंता राज कुरेकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, पूर नियंत्रण अधिकारी महेश भेंडारकर आणि कनिष्ठ अभियंता प्रविण कहार प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात वर्ष २०२२ मध्ये आॅगष्ट महिन्यात गोंदिया व तिरोडा या दोन तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान पूरपरिस्थितीमध्ये जीवित व वित्तीय हानी तसेच शेतकºयांचे घर, गोठे, जनावरे व शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी पूरप्रवण गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली व पूर येण्याची कारणे तसेच पूर परिस्थिती दरम्यान शोध व बचाव करण्याकरीता प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून जाणून घेतली.

वैनगंगा व बाघ नदीच्या काठावर असलेली गावे व खोलगट भागातील घरांमध्ये पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान तसेच वेळेवर शासनाकडून तात्काळ मदतदेण्याकरीता बोटीची व मनुष्यबळाची पुरेशी व्यवस्था इत्यादीबाबत जिल्हाधिकारी यांनी विस्तृत माहिती घेतली. तसेच जिल्हाधिकारी यांनी यावेळी उपस्थित गावकºयांशी संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. यावेळी गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील पूर प्रवण गावांचे सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल व नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.