३३ वर्षापासून गोबरवाही पोलीस ठाणे इमारतीच्या प्रतिक्षेत

भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : १९९० मध्ये गोबरवाही गावात पोलीस चौकी सुरू करण्यात आली. आधी गोबरवाही पोलीस चौकी नंतर पोलीस ठाणे गेल्या ३३ वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत आहे. ग्रामपंचतीच्या मालकीच्या इमारतीत भाड्याने पोलिस चौकी सुरू करण्यात आली, त्याच भाड्याच्या इमारतीत २०१२ साली पोलिस ठाणे सुरू करण्यात आले. गेली ३३ वर्षे गोबरवाही चौकी आणि आता पोलिस ठाणे भाड्याच्या इमारतीतच सुरू आहे. परंतु पोलीस इमारत व वसाहतीसाठी शासनाने अद्याप नवीन इमारत बांधलेली नाही, अत्यल्प जागेत पोलीस ठाण्याचे काम सुरू असुन पोलीस ठाणे नविन इमारतीच्या प्रतिक्षेत असल्याचे पहावयास मिळत आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी भंडारा जिल्हाधिकाºयांनी नाकाडोंगरी राज्य महामार्गाच्या काठावर पवनारखारी हमेशा उर्फ गणेशपूर गावातील जमीन भूमापन क्रमांक ११० ची सुमारे अडीच एकर शासकीय जमीन गोबरवाही पोलीस ठाण्याच्या वसाहतीसाठी मंजूर करण्यात आली. पण कदाचित राज्य सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे, शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे, मात्र या महत्त्वाच्या विभागाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे आणि शांतता आणि कायद्याची परिस्थिती वाईट होत आहे. राज्य सरकार ने लक्ष देणे आवश्यक आहे.

गोबरवाही पोलिस ठाण्यात पोलिसांची ४९ पदे मंजूर आहेत, मात्र येथे केवळ २९ पोलिस कार्यरत आहेत. पोलिस उपनिरीक्षकाचे एक पद रिक्त, २० पोलिस कमी आहेत. महिला पोलिसांची संख्याही कमी आहे. ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारांना ठेवण्यासाठी लॉकअप रूम नाही, त्यांना येथून २० किमी अंतरावर असलेल्या तुमसर पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवावे लागते. गोबरवाही येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्रात शासनाने १५ वर्षांपूर्वी सुमारे ५ लाख रुपये खर्च करून विच्छेदन गृह बांधले, मात्र आजतागायत येथे एकही शवविच्छेदन झालेले नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह तुमसर येथे पाठविला जातो. येथून उपजिल्हा रुग्णालय दूर आहे. मृतांचे नातेवाईक आणि पोलीस विभागालाही मोठा त्रास सहन करावा लागतो, तर येथील आरोग्य केंद्रात एमबीबीएस पदवी असलेले डॉक्टर उपलब्ध आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ४४ गावांचा समावेश आहे, मात्र गोबरवाही, आष्टी, पाथरी, खापा, कमकासूर, पागंडी, चिखली, मोठगाव, रोंघा, हिरापूर हमेंशा आदी सुमारे १० गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे अद्यापही रिक्त आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या पोलीस ठाण्याच्या परिसराला डोंगर आणि जंगलांनी वेढलेले आहे ज्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत.

सन १९९० च्या दशकात या भागाचे सर्वेक्षण इतर प्रांतातील नक्षलवादी पथकाने केले होते. सरकारी खात्याच्या नोंदीमध्ये याचा उल्लेख आहे. हा पोलीस स्टेशन परिसर नक्षलग्रस्त घोषित बालाघाट जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. या परिसरात मँगनीजच्या खाणी आहेत. त्यात स्फोटकांचा साठा आहे. तेथून सुमारे ३० वर्षांपूर्वी डिटोनेटरची चोरी झाली होती. त्याची नोंदही उपलब्ध आहे. गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीची हद्द नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलला जोडलेली आहे. येथे ही बहुसंख्य आदिवासी लोकसंख्या आहे. येथे आदिवासी प्रकल्प वर्षानुवर्षे राबविला जात आहे. गोबरवाही क्षेत्रात रेल्वे स्थानक, सरकारी बँक, सहकारी संस्था, पेट्रोल पंप, सरकारी कार्यालय, औद्योगिक क्षेत्रातील खाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेसे पोलीस दल असणे आवश्यक आहे. पोलिस दल कमी आहे, प्रभावी कायदा व शांतता राखण्यासाठी पोलीस ठाणे इमारत वसाहत लवकर बांधणे आवश्यक आहे. याबाबत परिसरातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील उच्च अधिकारी तातडीने कार्यवाही करतील, अशी अपेक्षा आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.