काँग्रेस नेत्याचा स्वीय सहायक असल्याची थाप मारत युवकाचा दोन वर्ष हॉटेलमध्ये फुकट ताव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून एक तोतया युवक गेल्या दोन वर्षांपासून हॉटेलमध्ये फुकट खात होता. परंतु, हॉटेलमालकाच्या ही बाब लक्षात आल्याने त्याला पकडण्यात आले. त्या युवकाने हॉटेलमालकावर चक्क चाकूने हल्ला केला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. ललित रामसंजीवन अग्निहोत्री (३३) रा. रामनगर, वर्धा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जखमी हॉटेल संचालक दुर्गाप्रसाद रामनरेश पांडे (४५) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पांडे कुटुंबाचे गणेशपेठ कॉलनीत भोजनालय आहे. गत दोन वर्षांपासून ललित त्यांच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी येत होता. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत तो होता. अनेकदा इतरांनाही पक्षाचे कार्यकर्ता असल्याचे सांगून हॉटेलमध्ये आणत होता. जेवण केल्यानंतर पैसे देत नव्हता. त्याच्यावर आतापर्यंतचे ५० हजार रुपये थकित होते. काही दिवसांपूर्वी पांडे यांना समजले की, तो कोणत्याही नेत्याचा स्वीय सहायक नाही. मंगळवारी दुपारी तो पांडे यांच्या जाधव चौकातील नवीन भोजनालयात जेवण करण्यासाठी आला आणि पैसे न देताच निघून गेला.

रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तो पुन्हा भोजनालयात आला. जेवण झाल्यानंतर दुर्गाप्रसादने त्याला दुपार आणि रात्रीच्या जेवणाचे पैसे मागितले. त्याने दुपारे बिल आधीच दिल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या भावाला फोन केला असता तो खोटे बोलत असल्याचे समजले. बिलाच्या पैशांवरून दुर्गाप्रसाद आणि ललित यांच्यात वाद झाला. या दरम्यान ललितने चाकू काढून दुर्गाप्रसाद यांच्यावर हल्ला केला. पोट, छाती आणि पायांवर चाकू मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आसपासच्या लोकांनी मध्यस्थी करून दुर्गाप्रसाद यांचा जीव वाचवला. त्यांना मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळावर पोहोचले. दुर्गाप्रसाद यांचे भाऊ अनुज पांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ललित विरुद्ध गुन्हा नोंदवित त्याला अटक केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *