‘त्या’ नराधमाला जीवन संपेपर्यंत सश्रम कारावास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गावातील ६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाºया सडक-अर्जुनी तालुक्यातील लोकेश खोटेले (२१) याला तदर्थ जिल्हा न्यायाधीश- १ व विशेष सत्र न्यायालयाने जन्मठेप जिवन संपेपर्यंतच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही सुनावणी २५ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. ही सुनावणी तदर्थ जिल्हा न्यायाधीश- १ व विशेष सत्र न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी केली आहे. २४ जुलै २०२२ रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास ६ वर्षाची मुलगी ही तिच्या बालमैत्रींनी सोबत गावातील हनुमान मंदिर येथे खेळत असतांना आरोपीने तोंड धुण्याची दातून तोडण्याचे कारण पुढे करून तिला गावाच्या बाहेरील तलावाच्या पाळीवर घेऊन गेले. तिच्यावर गंभीर लैंगिक अत्याचार केला होता. त्यामुळे पिडितेला त्रास झाल्याने ती जोराने रडू लागली. त्या रडण्याच्या आवाजामुळे जवळ असलेल्या स्त्रीयांच्या लक्षात आल्याने पुढील गंभीर घटना टळली. स्त्रियांनी पिडितेची आई व गावातील प्रतिष्ठीत लोकांना या घटनेची माहिती दिली. पिडितेच्या आईने आरोपीविरूद्ध पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे तक्रार केली. त्या आधारावर आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३७६ (अ) (ब), कलम ६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रमोद बांबोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय भिसे यांनी सविस्तर तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.या प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकीलव सरकारी अभियोक्ता महेश एस. चांदवानी यांनी एकुण १२ साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली. अति. सरकारी अभियोक्ता कृष्णा डी. पारधी यांनी या प्रकरणात अभियोग पक्षास सहकार्य केले. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर तसेच कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय अहवाल व डी. एन. ए. अहवाल या आधारावर तदर्थ जिल्हा न्यायाधीश- १ व विशेष सत्र न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपीला शिक्षा सुनावली. या प्रकरणात न्यायालयीन कामकाजासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरिक्षक सिंगनजुडे यांच्या देखरेखीत सुनिल मेश्राम यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *