गोंदिया जिल्ह्यात ३१८० महिलांना थायरॉईडचा विळखा

प्रतिनिधी गोंदिया: नेहमी आपल्या घराकडे, घरातल्या सदस्यांची काळजी घेणाºया महिला या बहुधा कामाच्या अधिक व्याप्तीमुळे वा आरोग्याबद्दल असलेल्या निष्काळजीपणामुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. हे आता जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील ४ लाख ४२ हजार २५७ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात महिलांची तपासणी व रक्ताचे नमुने घेऊन आवश्यक त्या प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या. यात तपासणी अंती २२२९५ महिलांना रक्तक्षय, १७६२३ महिलांना उच्च रक्तदाब, ९४२८ महिलांना मधुमेह व ३१८० महिलांना थायरॉइड सारख्या समस्या असल्याचे समोर आले. आजच्या धकाधकीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे थायरॉइड हा आजार अनेकांना बळावताना दिसत आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला या अधिक धावपळ करतात. त्यांच्याकडे कामाच्याही जबाबदाºया अधिक असतात. त्यासोबतच नैसर्गिक मासिक पाळी, गर्भावस्था या सगळ्यामुळे त्यांच्यात हार्मोन्स बदल होतात. त्यामुळेच महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे.

गरोदर महिलांमध्ये आणि प्रसूतीनंतर पहिल्या ३ महिन्यांच्या कालावधीत थायरॉइडची समस्या ४४.३ टक्के महिलांमध्ये आढळते. थायरॉईड ग्रंथी घशाच्या भागात असते आणि ती खूप लहान असते. पण, शरिराला निरोगी ठेवण्यासाठी आणि अनेक आजारांपासून संरक्षण करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. थायरॉईड ग्रंथीदेखील चयापचय प्रणाली योग्य राखण्यात मोठी भूमिका बजावते. जर ही ग्रंथी खूप काम करत असेल किंवा खूप मंद गतीने काम करत असेल तर दोन्ही स्थितीत शरिराला त्रास होतो. जेव्हा थायरॉईडची समस्या उद्भवते, तेव्हा एक लक्षण नाही तर शरिरात अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. थायरॉइडची एक नवीन समस्या शहरी व ग्रामीण भागात आढळून येत आल्याची माहिती समोर आली आहे. यात ३१८० महिलांपैकी १९७२ महिलांना हायपोथायरॉइड तर १२०८ महिलांना हायपरथायरॉइड दिसून आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *