काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना संगणक परिचालकांचे निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : राज्यातील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत संगणक परिचालकांनी आपल्या न्याय मागणीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामविकास आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या पूर्वीच्या संग्राम व सध्याच्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पत मागील १२ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक काम करीत आहेत. कोरोना काळात त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडत प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुटुंबाचे सर्व्हेक्षणही ते करीत आहेत. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून संगणक परिचालक आपली प्रामाणिक सेवा देत आहेत. याशिवाय ग्रामपंचायत स्तरावरील इतरही कामे करून सुद्धा त्यांना केवळ ६ हजार ९३० रुपये तुटपुंजे मानधन दिले जाते. सदर मानधनही सहा सहा महिन्या नंतर दिल्याची थट्टा केली जाते. संगणक परिचालक ग्रामपंचायत मधील सर्व प्रकारची आॅनलाईन व आॅफलाईन कामे मागील १२ वर्षांपासून करीत असून शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठी १२ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहे.

दरम्यानच्या काळात शासनाने संगणक परिचलकांना आकृतीबंधात घेण्याचे व मानधन वाढीचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे शासन आणि कंपनीच्या विरोधात राज्यातील संगणक परिचालक यांच्या मनात असंतोष निर्माण झाला असून टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जात आहे. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून सुधारित आकृतीबंधानुसार किमान मासिक वेतन २० हजार रुपये व कर्मचारी दर्जा द्यावा, नियमबाह्य कामे लावताना त्याचा वेगळा मोबदला द्यावा, संगणक परिचालकांवर लादण्यात आलेली चुकीची टार्गेट सिस्टीम पूर्णपणे बंद करण्यात यावी. अशी मागणी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व सचिवाना दिलेल्या लेखी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले असून पटोले यांचे स्वीय सहाय्यक एच.बी.भेंडारकर, उमेश भेंडारकर, आनंद नागोसे यांनी निवेदन स्वीकारले आहे. तात्काळ मागण्या पूर्ण न झाल्यास दि.११ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *