पवनी न्यायालयात वकिलांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : गोंदिया न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुळकर्णी यांनी वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.पराग तिवारी यांच्या सोबत झालेल्या शाब्दिक वादातून या वकीलाला ९० रुपए दंड अथवा दंड न भरल्यास पाच दिवसांचा कारावास अशी शिक्षा ठोठावली. त्यामुळे या वकीलाने दंड न भरता कोठडी स्विकारली. मात्र याचे पडसाद गोंदिया व भंडारा जिल्ह्यात उमटले. ५ फेब्रुवारी ला मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुळकर्णी यांच्या कोर्टात अ‍ॅड.तिवारी यांचे पक्षकाराचे धनादेश अनादर प्रकरण ठेवले होते. परंतू सुणावणी साठी कोर्टात पोहचण्यास त्यांना थोडा विलंब झाला. त्यामुळे कोर्टाने नाराजी व्यक्त केली.

मात्र त्यावरून न्यायाधीश व वकील दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावर चिडून जाऊन न्यायाधीश यांनी पक्षकारांना वकील बदलण्याची सूचना केली. एवढेच नव्हे तर कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका ठेवून दंड व शिक्षा ठोठावली. या घटनेचा निषेध म्हणून पवनी न्यायालयातील वकीलांनी एकमताने ठराव घेऊन एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन केले व न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसेच वकिलाची निर्दोष मुक्तता करावी व या न्यायाधीश महोदयावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पवनी वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या काम बंद आंदोलनात वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश तलमले, सचिव अ‍ॅड. योगीराज सुखदेवे, माजीअध्यक्ष अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी, अ‍ॅड. खेमराज जिभकाटे, अ‍ॅड. राहूल बावने, अ‍ॅड. सुनील बंसोड, अ‍ॅड.विवेक देशमुख, अ‍ॅड.शरद सावरकर, अ‍ॅड. संजय कावळे, अ‍ॅड.कावेरी शेंडे व अ‍ॅड. श्रद्धा कामथे यांनी सहभाग घेतला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *