सरपंचाला शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत बपेरा येथील सरपंच यादवराव बोरकर यांनी शासकीय जागेवर दुकान आणि घराचे बांधकाम केल्याप्रकरणी सरपंच यादवराव बोरकर यांना सदस्य पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. सदर कारवाई जिल्हाधिकारी यांनी केल्याचे सांगितले जात आहे. २२ डिसेंबर २०२२ ला ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत यादवराव बोरकर हे सरपंच पदावर निवडून आले होते. दरम्यान पदमुक्त सरपंच बोरकर यांनी अप्पर आयुक्त नागपूरच्या दालनात धाव घेतली असल्याचेही वृत्त पुढे आले आहे. जिल्हा परिषद क्षेत्र असलेली बपेरा ही मोठी ग्रामपंचायत असून डिसेंबर २०२२ मध्ये सरपंच पदाची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली आहे. सरपंच पदाची निवड थेट निवडणुकीतून झाली आहे. थेट निवडणुकीत यादवराव बोरकर हे निवडून आले आहेत. सरपंच पद निवडणुकीच्या पूवीर्पासूनच त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कडेला दुकान आणि घरांचे बांधकाम केले आहे. ही जागा झुडपी जंगल अशी नोंद करण्यात आली असून आठवडी बाजारासाठी मुकरर आहे. गट क्रमांक ५५६ मध्ये ०.८४ आर जागा शासकीय असून १३२० चौ फूट असे बांधकाम दिसून आले आहे.

तलाठी दस्तऐवजातील अतिक्रमण पंजित सन १९९० ते २०१२ या कालावधीत अतिक्रमण असल्याचे नोंद करण्यात आली आहे. सरपंच यादवराव बोरकर यांचे शासकीय जागेत अतिक्रमण असल्याने पदमुक्त करण्याचे कारवाईसाठी गावातील व्यंकट सुभाष राऊत यांनी जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी सुनावणी घेतली आहे. या सुनावणी दरम्यान तलाठी अतिक्रमण नोंद दस्तऐवज, ग्रामपंचायतचे नमुना ८ व अन्य दस्तऐवज तपासण्यात आले आहेत. ३१ मे २०२३ पासून शासकीय जागेवरील अतिक्रमण संदर्भात सुनावणी घेण्यात आली आहे. शासकीय जागेवरील अतिक्रमण आणि घर व दुकानाचे पक्के बांधकाम केल्याप्रकरणी सरपंच यादवराव बोरकर हे दोषी आढळून आले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी यांनी ५ मार्च २०२३ च्या निर्णयाने सरपंच यादवराव बोरकर यांना सदस्य पदावरून पदमुक्त केले आहे.

शासकीय जागेवरील अतिक्रमण आणि घर व दुकानाचे पक्के बांधकाम सरपंच यादवराव बोरकर यांचे अंगलट आले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांचे निर्णयाला आव्हान देणारी याचिका अप्पर आयुक्त नागपूर यांचे दालनात दाखल करण्यासाठी सरपंच यादवराव बोरकर यांनी धाव घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. शासकीय जागेवरील अतिक्रमण प्रकरणात सिहोरा परिसरातील ही दुसरी कारवाई असल्याचे सांगितले जाते. गोंडीटोला ग्रामपंचायतचे सरपंच आणि दोन सदस्य शासकीय जागेवर पक्के घरांचे बांधकाम प्रकरणात पदमुक्त करण्यात आले आहेत हे येथे उल्लेखनीय आहे. सदर प्रकरणात सरपंच यादवराव बोरकर यांचेशी संपर्क साधला असता या प्रकरणात स्टे आणल्याचे व पंचायत समिती तुमसरचे खंड विकास अधिकारी यांना देण्यात आले असुन आज कलेक्टर व तहसीलदार तुमसर यांना सुद्धा देणार असल्याचे सदर प्रतिनिधीशी बोलतांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *