
भंडारा पत्रिका / वार्ताहर गर्रा/बघेडा : तालुक्यातील गायमुख देवस्थान येथील चौरागड शिव मंदिरामध्ये एका इसमाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. कैलास सेवकराम सिंगनजोडे वय ३८ वर्षे रा.हसरा ता.तुमसर असे मृत व्यक्तीची ओळख पटली असुन तो दि.४ जानेवारी रोजी घरून बाहेर पडला होता. मृतक कैलास हा गेली तीन-चार वर्षापासून कर्करोगाने ग्रस्त होता. त्यामुळे तो नेहमीच मानसिक तणावात राहत होता.
घटनेच्या दिवशी तो मी डॉक्टरकडे जात असल्याचे सांगुन घरून बाहेर पडला व त्याने गायमुख येथील चौरागड शिव मंदिरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. घटना उघडकीस येताच याची माहिती पोलीस स्टेशन आंधळगाव ला देण्यात आली. आंधळगाव पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करीता तुमसर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतकाच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास आंधळगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितीन कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोज सोलंकी हे करीत आहेत.