
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील मोक्षधाम (स्मशानभूमी) परिसराचा कायापालट करण्याच्या दृष्टीने आज एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि ‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’ अंतर्गत मंजूर झालेल्या समाजभवन बांधकामाचा भव्य भूमिपूजन सोहळा रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी पार पडला. तुमसर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांच्या शुभहस्ते या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. तुमसर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार राजू कारेमोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या समाजभवनासाठी भरीव निधी प्राप्त झाला आहे.
मोक्षधाम परिसरात अंत्यविधी व अन्य कार्यासाठी येणाºया नागरिकांना बसण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे प्रशस्त भवन उभारले जाणार आहे. हे भवन भविष्यात विविध सामाजिक उपक्रमांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या मंगलप्रसंगी मोक्षधाम सेवा समितीचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने समितीचे कार्यकारी अध्यक्ष बाल्या मदनकर, सचिव अनिल कारेमोरे, विष्णू जोशी, सुशील आगाशे, पंढरीनाथ धुर्वे आणि लालु ईसारीया यांचा समावेश होता. तसेच प्रशासकीययंत्रणेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता वैद्य, नगर परिषदेचे बांधकाम अभियंता निलेश भगत, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते जितूभाऊ देवडे आणि अभय भेदे यांची प्रमुख उपस्थिती होती.