
भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी पालांदूर : मानवाने स्वत:च्या स्वार्थाकरिता निसर्गालाच दावणीला बांधले आहे. शासकीय स्तरावर झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेचा कितीही उदघोष होत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे. वृक्षतोड थांबता थांबत नाही आहे. लाखनी तालुक्यातील अड्याळ वन परिक्षेत्र हद्दीतील किटाडी क्षेत्र सहायक कार्यालय अंतर्गत येणाºया पालांदूर परिसरात राजरोसपणे होत असलेली वृक्षांची कत्तल ही बाब नित्याचीच झाली आहे. वृक्ष हे पृथ्वी व पर्यावरणाचे चैतन्य आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस ढासळत चालले असून असमतोल वाढला आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर शतकोटी वृक्ष लागवडी सारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. वृक्षांचे संगोपन व संवर्धन यावर कोट्यवधींचा खर्च होतो. दुसरीकडे मात्र शेतामधील हजारो झाडांवर ठेकेदारांच्या माध्यमातून कुºहाड चालविली जात आहे. पालांदूर परिसरासह लाखनी तालुक्याभर अनेक भागात तोडून ठेवलेल्या लाकडांमुळे मोकळ्या मैदानांना जणू लाकूड आगाराचे स्वरूप आले आहे. आंबा, चिंच, टेंभुर्णी, बोर, जांभूळ अशा फळझाडांसोबतच कडुलिंब, अंजन, कीन, बाभूळ, मोह, सागवान अशा वृक्षांची लागवड शेतशिवारात केली आहे. अनेक वर्षे जुनी असणारी ही झाडे शेतकºयांना प्रलोभन दाखवून कापण्याचा सपाटा सर्रास सुरुच असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे.