दरोडा टाकणारे बाप-लेक १२ तासांत जेरबंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शहराजवळील फुलचुर परिसरातील साई माऊली कॉलोनीत मध्यरात्री चाकूचा धाक दाखवून आईमुलाकडून तब्बल २० लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज लुटणाºया दोन अज्ञात दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासांत जेरबंद करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने शहरात पोलिसांच्या कारवाईने समाधान व्यक्त होत आहे. मुकेशकुमार डोंगरे (५९) व आर्यन मुकेशकुमार डोंगरे (२४) रा. साई माऊली कॉलोनी फुलचूर गोंदिया असे दरोडेखोर बापलेकांचे नाव आहे. फिर्यादी प्रतिक लालचंद उईके (२७), रा. साई माऊली कॉलोनी, फुलचुर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजता दोन अनोळखी इसमांनी तोंडावर दुपट्टा बांधून घरात प्रवेश केला.

चाकूचा धाक दाखवून आई व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत घरातील १३९ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४३८ ग्रॅम चांदीचे दागिने व २८ हजार रुपये रोख, असा २० लाख ९६ हजार ६४० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी तात्काळ तपासाचे आदेश देत स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईसाठी सज्ज केले. पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात दोन स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला.

गोपनीय माहितीच्या आधारे संशयित म्हणून मुकेशकुमार डोंगरे व आर्यन मुकेशकुमार डोंगरे या बाप-लेकावर संशय बळावला. तांत्रिक तपासात दोघेही बालाघाटकडे पळून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पथकाने रजेगाव, जि. बालाघाट (मध्यप्रदेश) परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या बॅगेतून संपूर्ण चोरीचा ऐवज, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅक्टिव्हा दुचाकी क्रमांक एमएच ३५ एएफ २३१७ व दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. असा एकूण २२ लाख ६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनेनंतर अवघ्या १२ तासांत आरोपी पकडले गेल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. जप्त मुद्देमालात १९ लाख ४६ हजाराचे सोन्याचे दागिने, १ लाख २२ हजार ६४० रुपयाचे चांदीचे दागिने, २८ हजार रोख, ८० हजाराची दुचाकी, ३० हजार किमतीचे दोन मोबाईल यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक वनीता सायकर व पथकातील अधिकारी-अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *