काँग्रेसचे डफली बजाओ आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान विक्री केल्यानंतरही तीन महिन्यांपासून शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही, मागील हंगामातील बोनस अजूनही प्रलंबित आहे, मनरेगाचे काम ठप्प असून ग्रामपंचायती आर्थिक संकटात सापडल्या आहेत, आदी विविध प्रश्नांवरून आज गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी शहरातील प्रशासकीय इमारती समोर जिल्हा काँग्रेस कमीटीच्या वतीने डफली बजाओ, थाळीनाद आंदोलन करत शासनाच्या उदासीनतेविरोधात जोरदार निषेध नोंदविण्यात आला.

धानाचे चुकारे त्वरित द्यावेत, मागील हंगामातील बोनस जमा करावा, नोंदणीकृत धान उचल मर्यादा वाढवावी, रब्बी धानाचे प्रलंबित चुकारे अदा करावेत, कृषी पंपांचे भारनियमन बंद करून २४ तास वीजपुरवठा करावा, मनरेगाअंतर्गत कामांना तत्काळ मंजुरी देऊन लॉक मस्टर खुले करावेत, पंतप्रधान घरकुल व आवास योजनांचे थकित हप्ते त्वरित द्यावेत, तसेच २०२२ पासून थकीत मनरेगा कुशल कामांची देयके अदा करावीत आदी प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. शिवाय मे २०२५ मधील गारपीट तसेच आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने शेतकरी अडचणीत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात आमदार नाना पटोले, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *