
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : भरधाव दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला, तर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला. महेश सुभाष शहारे (३२) असे मृत दुचाकीचालकाचे नाव असून रोशन विलास पालांदूरकर (२६), दोघेही रा. घोगरा) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात खोपडा-इसापूर मार्गावर आज गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार महेश व रोशन हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच ३५ एक्यू ५८७२ ने गांगला येथून येत होते. महेश शहारे दुचाकी चालवत होता. खोपडा- इसापूर मार्गावर अचानक दुचाकी स्लीप झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर त्यांना तातडीने तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी महेश शहारे याला मृत घोषित केले. रोशन याचे वर गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून मृतक महेश याचे शव उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे आणून शवविच्छेदनानंतर त्याचे वर घोगरा स्मशान घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले. महेशच्या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. महेश शहारे याच्या पश्चात आईवडील, गर्भवी पत्नी व बहीण असा परिवार आहे. अपघाताची माहिती कळताच हवालदार संजीव बनते व प्रणव तिवारी यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला असून महेशचे काका फिर्यादी रमेश मोतीराम शहारे यांचे तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी मृतकावर आपले वाहन बेजबाबदारपणे हयगईने चालवून मृत्यूस कारणीभूत झाल्याने भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ब) १०६ (१) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मसराम करीत आहेत.