
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देवरी येथील प्रस्तावित १३२ केव्ही वीज उपकेंद्राच्या कामाला अखेर सुरुवात झाली. थाटात पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यात आमदार डॉ. परिणय फुके यांनी आजचा दिवस केवळ भूमिपूजनाचा नाही, तर या भागातील नागरिक आणि शेतकरी बांधवांच्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी करणारा दिवस असून निराशेचा अंधार दूर करून आशेचा दिवा लावण्याचा हा क्षण असल्याचे सांगितले.
आज देवरी वीज उपकेंद्रसाठी आमदार डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, स्थानिक शेतकरी बांधव, नागरिक आणि उद्योजकांनी सातत्याने वीज उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून येथील समस्यांची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आजचा दिवस केवळ भूमिपूजनाचा नाही, तर या भागातील नागरिक आणि शेतकरी बांधवांच्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी करणारा दिवस आहे. निराशेचा अंधार दूर करून आशेचा दिवा लावण्याचा हा क्षण आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला असून, त्या संकल्पपूतीर्साठी आपण त्यांच्या शिलेदारांप्रमाणे काम करत आहोत. विजेअभावी शेतकरी आणि उद्योजकांचे नुकसान होऊ नये, यासाठी नेहमीच सतर्क राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. देवरी व आमगाव परिसरात आवश्यक क्षमतेचे उपकेंद्र नसल्यामुळे कमी दाबाचा वीजपुरवठा होत होता. परिणामी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठा, घरगुती व औद्योगिक गरजा पूर्ण करण्यात मोठे अडथळे निर्माण होत होते. देवरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये, विशेषत: देवरी व आमगाव भागात, व्होल्टेजची गंभीर समस्या होती. त्यामुळे १३२ केव्ही उपकेंद्र उभारणे अत्यावश्यक होते. आता या उपकेंद्राचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना उद्योग, कृषी व विविध क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासणार आहे. वीज निर्मितीबरोबरच वितरण व्यवस्थेची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरणार असल्याने महावितरणने अधिक तत्परता व वेगाने काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वीज क्षेत्रातील कामगिरीत महावितरणने प्रथम क्रमांक कायम राखला असून, हा मान उपकेंद्र लवकर सुरू करून कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत घरगुती ग्राहकांना मोफत वीज आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने चांगली कामगिरी केली असून, त्याच धर्तीवर देवरी-आमगाव प्रकल्पही लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. लवकरात लवकर कामे पूर्ण करा भूमिपूजनानंतर कामांना गती देऊन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाºयांना केल्या. कामे पूर्ण झाल्यानंतर देवरी, आमगाव व परिसरातील नागरिक, शेतकरी आणि उद्योजकांना स्थिर व दर्जेदार वीजपुरवठा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.