
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी घडलेल्या घटनेने व्यापारी व शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ अडते व्यापारी डुलीचंद निखाडे (वय ६०) यांचा सार्वजनिक बाथरूममध्ये संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आले. सदर घटनेमुळे संपूर्ण मार्केट यार्ड परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निखाडे हे दररोजप्रमाणे सकाळी सुमारे ८.०० वाजता आपल्या दुकानात आले होते. काही वेळानंतर ते लघुशंकेसाठी मार्केट यार्डातील सार्वजनिक स्वच्छतागृहात गेले. बराच वेळ उलटूनही ते बाहेर न आल्याने काही हमाल व व्यापाºयांनी पाहणी केली असता ते आतमध्ये निपचित अवस्थेत आढळले. सदर घटनेची बातमी परिसरात पसरली असता मोठ्या संख्येने व्यापारी, हमाल व शेतकरी घटनास्थळी जमा झाले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक चर्चेनुसार हृदयविकाराचा झटका असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, काही व्यापाºयांकडून निखाडे यांना मद्यपानाचे व्यसन असल्याची अनौपचारिक चर्चा सुरू आहे. तथापि, यासंदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेमुळे बाजार समितीतील व्यवहार काही काळ विस्कळीत झाले होते. दुलीचंद निखाडे यांच्या निधनाने व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.