
सडक अर्जुनी : कर्जाचा डोंगर आणि आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला येथील एका शेतकºयाने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. योगराज मनिराम पुस्तोडे (वय ५२) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १२) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गिरोला येथील शेतकरी योगराज पुस्तोडे यांच्यावर सहकारी संस्थेचे ४० हजार रुपयांचे कर्ज होते. घटनेच्या दिवशी सकाळी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य शेतात गेले होते. सायंकाळी कुटुंब घरी परतले तेव्हा योगराज घरी दिसले नाहीत. शोधाशोध केली असता, तपास करत गावाजवळील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. योगराज पुस्तोडे यांच्या पश्चात घरीआई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड गेल्याने पुस्तोडे कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडले आहे.