
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेत पाचव्या दिवशीही कॉपीिंगचे प्रकार समोर आले आहेत. पाचव्या दिवशी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन विषयाच्या पेपरमध्ये अनियमितता नोंदली गेली, तर चौथा दिवस अपवाद ठरला आणि निरंक राहिला. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माहितीनुसार, चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत; तर दुपारी अर्धमागधी, रशियन आणि अरेबिक या विषयांमध्ये कोणतेही कॉपीिंगचे प्रकार नोंदलेले नाहीत. पाचव्या दिवशी दोन प्रकरणे उघड झाली आहेत. सोमवार (दि. १६) सकाळच्या सत्रात तर्कशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयाचा पेपर होणार आहे. राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागांमध्ये परीक्षा घेतली जात आहे. पहिल्या दिवशी १० फेब्रुवारीला ४२ कॉपी प्रकरणे नोंदली गेली, दुसºया दिवशी चार प्रकरणे, तिसºया दिवशी ३० प्रकरणे समोर आली. विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि तणावमुक्त परीक्षा देता यावी म्हणून राज्य दक्षता समिती आणि जिल्हा दक्षता समितीने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा प्रशासन सतर्क असून, विद्यार्थ्यांची योग्य पद्धतीने परीक्षा घेतल्याची खात्री करत आहे.