
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गाजलेल्या बाळ विक्री प्रकरणात मुख्य आरोपी असलेले गोंदिया येथील न्यू बालाजी क्लिनिकचे संचालक डॉ. नितेश बाजपेयी यांना अखेर भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. संध्याकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा उलगडा ३ फेब्रुवारी रोजी झाला होता. उपचाराच्या नावाखाली एका चिमुकलीला नागपूर येथे तीन लाख रुपयांत विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी डॉ. बाजपेयी यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील दोन आरोपी यापूर्वीच पोलिसांच्या ताब्यात होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी डॉ. बाजपेयी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्यावर भंडाºयातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. १७ फेब्रुवारी रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता वाढली होती. अखेर पोलिसांनी रुग्णालयातूनच त्यांना ताब्यात घेतले. सध्या आरोपी डॉ. बाजपेयी भंडारा पोलिसांच्या ताब्यात असून उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मुख्य आरोपीच्या अटकेमुळे या प्रकरणातील अनेक बाबींचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे यांनी अटकेची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.