
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नाकाडोंगरी : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या पथकाने रानडुकराची शिकार करून त्याची विक्री करणाºया टोळीचा पर्दाफाश केला असुन एक रानडुक्करासह १२ जणांना ताब्यात घेतले आहे. आज दि.१९ फेब्रु. २०२६ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे पथक गस्त घालत असतांना तुमसर वनपरिक्षेत्रातील झांझेरिया बीट अंतर्गत वाघेश्वर तलाव परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आली. पथकाने अधिक तपास केला असता पिकअप बोलेरो (क्र. एमएच ४९ बीझेड ७१०४) वाहन तलावाजवळ उभे असल्याचे निदर्शनास आले.
पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एक जंगली रानडुक्कर व १० ते १२ इसम आढळून आले. प्राथमिक चौकशीत संबंधित इसम जंगल व शेत परिसरातील जंगली रानडुक्कर पक- डून त्याची विक्री करत असल्याची माहिती समोर आली. वनविभागाने सर्व १२ जणांना ताब्यात घेतले आहे. वनविभागाच्या पथकाने कारवाई दरम्यान १ रानडुक्कर, १३ जाळे, १ लोखंडी कुºहाड, 1 सुरा, ४० बांबू काठ्या, १० केबल, १२ अँड्रॉईड मोबाईल फोन तसेच महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन जप्त केले. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (सुधारित २०२३) मधील कलम ९, ४८ अ, ४९, ५० व ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे. वनविभागाने नागरिकांना वन्यजीव संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.