
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिंतासावगी : न्यू कॉलनी ब्लॉक क्र. ०४, सिंतासावगी येथे राहणारी कु. मानवता उर्फ अंशु संजय चौरे (वय १७ वर्षे) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली या प्रकरणी गोबरवाही पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, फिर्यादी संजय गागरुजी चौरे (वय ४२ वर्षे, व्यवसाय- नोकरी, मॉईल चिखला) हे दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास कामावरून घरी परतले. त्यावेळी त्यांची मुलगी कु. मानवता बाथरूममध्ये होती. त्यांनी लहान मुलीला चहा बनविण्यास सांगून मोबाईल बेडरूममध्ये चार्जिंगला लावला व हॉलमध्ये टीव्ही बघत बसले.
दरम्यान, त्यांच्या मोबाईलवर फोन आल्याने त्यांनी मृतक मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, कु. मानवता हिने बेडरूममधील पंख्याला दुपट्टयाने गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनेनंतर त्यांनी पत्नीच्या मदतीने मुलीला तत्काळ मॉईल दवाखाना, सिंतासावगी (चिखला) येथे नेले. तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून तोंडी तक्रार दिली. ठाणेदारांच्या लेखी आदेशानुसार मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.