
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदुर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुदैर्वी घटना सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील लुकेश उपरीकर यांच्या शेता जवळील वळण रस्त्यावर घडली. प्राप्त माहितीनुसार,मृत दुचाकीस्वार हा लाखनीकडे काळ्या रंगाच्या हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच ४० जी ५४) या दुचाकीने जात असताना समोरून येणाºया अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. वळण रस्ता असल्याने दोन्ही वाहने आमोरासमोर आदळल्याची चर्चा परिसरात आहे.धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पालांदूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपासासाठी पार्थिव लाखनी येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही प्राथमिक तपासात संबंधित दुचाकी नागपूर येथील वाडी परिसरात नोंदणीकृत असल्याचे समोर आले आहे.दुचाकीची आरसी बुक मुदत संपलेली असल्याची माहितीही मिळाली आहे. अपघाताच्या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सतीश बन्सोड यांच्या मार्गदर्शनात पालांदुर पोलिस करीत आहेत.