भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : एखाद्या प्रशासकीय अधिकाºयाची बदली झाल्यानंतरही त्याच्या कार्याची आठवण नागरिकांच्या मनात कायम राहते आणि त्याच अधिकाºयाचा स्वयंस्फूर्तीने नागरी सत्कार केला जातो, अशी घटना विरळाच. तुमसरमध्ये रविवारी हा प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला. नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या नागरी सत्कार सोहळ्याने संपूर्ण सभागृह कृतज्ञता, प्रेरणा आणि अभिमानाच्या भावनेने भारावून गेले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, तुमसर यांच्या वतीने डॉ. आंबेडकर नगर (बुद्धभूमी) येथील सांस्कृतिक सभागृहात हा भव्य सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार उपेश अंबादे होते. प्रमुख अतिथी म्हणून बी. एम. गजभिये, माजी उपाध्यक्ष जयप्रकाश भवसागर, नगरसेवक तिलक गजभिये, नगरसेविका वैशाली भवसागर, आर्किटेक्ट पराते, सिंग साहेब, अरविंद कारेमोरे, प्रिया अंबादे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात जयप्रकाश भवसागर यांनी सिद्धार्थ मेश्रामयांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले, तर आभार रिना किशोर माटे यांनी मानले.