शिरीनबाई नेत्रावाला शाळेच्या व्यवस्थापन, गैरकारभाराविरुद्ध पालक आक्रमक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : माणेकनगर माडगी येथील शिरीनबाई नेत्रावाला शाळेत मुंडीकोटा येथील कु. दृष्टी स्वप्नील भांडारकर ही वयानुसार वर्ग १ ली मध्ये प्रवेश देऊन पात्र ठरत नसतांनाही वर्षभर शाळेत ठेवले व पास झाल्याचे निकाल सुध्दा दिला. तसेच पालकांकडून २५,९१० रुपये फीस घेण्यात आले. याप्रकरणी पालकांनी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती तुमसर, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा आणि शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती आणि त्यावरून संबंधित पालकांची सुनावणी घेतली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी दिनांक १५ मार्च, २०२४ ला संबंधित शाळेवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. परंतु संबंधित शाळेवर पाच वर्ष होऊनही अद्यापही आजपर्यंत शिरीनबाई शाळेवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित पालकांना अजूनही न्याय मिळाला नसून ते आजही न्यायापासून वंचित आहेत. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार उपेश अंबादे यांना स्वराज्य युवा एकता फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संबंधित पालकांनी निवेदन देऊन शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९आणि महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यीत शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ या अधिनियमांतील तरतुदीनुसार “शिरिनबाई नेत्रावाला स्कूल, माडगी, ता. तुमसर जि. भंडारा” या शाळेची शासन मान्यता काढण्यात यावे. आणि अश्या शाळा व्यवस्थापन व शाळेच्या गैरकारभाराविरुद्ध कठोर कायदेशीर व शिक्षण विभागाच्या नियमानुसार कारवाई करून संबंधित पालकांना न्याय मिळवून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, स्वप्निल भांडारकर, किशोर शेंडे, मदन इलमे, गणेश दमाहे, बाळकृष्ण राऊत, शामराव कावळे, रमेश दमाहे, सुशील सेलोकर उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *