
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : धर्मांध हल्लेखोर तुषार दामगुडे ला त्वरित अटक करून त्याची बंदूक व परवाना जप्त करा अशा मागणीचे निवेदन भाकपचे पोलीस अधीक्षका मार्फत राज्याचे गृहमंत्री व पोलिस महासंचालक मुंबई यांच्या नावे एका शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन पोलीस निरीक्षक रमाकांत दीक्षित यांनी स्वीकारले. निवेदनात भाजपशी संबंधित तुषार दामगुडे व त्याच्या गुंडांनी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याचे तुषार दामगुडे याने जाहीर समर्थन केले असून, हनुमंत पवार यांच्यासारख्या कम्युनिस्ट विचारांच्या कार्यकर्त्यांना मारण्यासाठीच मला कायदेशीर पिस्तूल परवाना मिळालेला आहे, असे अत्यंत गंभीर, चिथावणीखोर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे वक्तव्य त्याने खुलेआम केले आहे.
या वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर सर्वत्र प्रसारित झाला असूनही राज्याचे गृह खाते आणि पोलीस प्रशासन यावर कोणतीही ठोस कारवाई करत नाही, ही बाब अत्यंत संतापजनक व धोकादायक आहे. सरकारने अशा व्यक्तींना माणसे मारण्याचा परवाना दिला आहे काय, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तुषार दामगुडे याने हनुमंत पवार याच्यावर हल्ला केला व आता उघडपणे हिंसेचे समर्थन करीत असून, राजकीय मतभेदांवर गोळीबाराची भाषा करत आहे. ही बाब लोकशाही, संविधान आणि कायद्याच्या राज्यासाठी अत्यंत घातक आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षच्या संरक्षणाखाली असे गुंड मोकाट फिरत असतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तुषार दामगुडे याच्यावर तात्काळ दखलपात्र कलमांसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला कोणताही विलंब न करता अटक करण्यात यावी. त्याचा पिस्तूल वापराचा परवाना त्वरित रद्द करण्यात यावा.
या निवेदनावर तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यास बाध्य होईल, याची नोंद घ्यावी अशा मागणीचे निवेदन एका शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. शिष्टमंडळात भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके, तालुका सचिव कॉम्रेड गजानन पाचे, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड सदानंद इलमे जिल्हा कौन्सिल सदस्य कॉम्रेड भगवान मेश्राम, कॉम्रेड ताराचंद देशमुख, कॉम्रेड गीता मेश्राम, कॉम्रेड महानंदा गजभिये, कॉम्रेड गिरीश मेश्राम, कॉम्रेड वामनराव चांदेवार इत्यादींचा समावेश होता.