
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात पुढे होणाºया जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा स्वतंत्र कॉलम असावा, या महत्त्वाच्या मागणीसाठी भंडारागोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी संसद परिसरात आंदोलन सुरू केले आहे. लोकसभेच्या पायºयांवर बसून ते या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधत आहेत. संसदेतील निलंबनाची कारवाई झालेली असतानाही खासदार डॉ. पडोळे यांनी आपला लढा थांबवलेला नाही. उलट, प्रत्येक दिवशी जिल्हा, राज्य आणि केंद्र पातळीवरील विविध लोकहिताचे प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. लोकशाही मागार्ने प्रश्न मांडत जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.
ओबीसी समाजाला सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या योग्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आगामी जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम असणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. पडोळे यांनी यावेळी नमूद केले. यामुळे देशातील ओबीसी समाजाची खरी लोकसंख्या व परिस्थिती समोर येईल आणि त्यानुसार धोरणात्मक निर्णय घेणे सरकारला शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या पायºयांवर बसून केलेल्या या आंदोलनाद्वारे ते केवळ ओबीसी समाजाचाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवरही सातत्याने आवाज उठवत आहेत. जिल्ह्यातील विकासकामे, शेतकरी, बेरोजगारी, शिक्षण, पाणीपुरवठा तसेच विविध सामाजिक प्रश्न संसदेत व सार्वजनिक पातळीवर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.