नवेगावबांध धरण जलाशयात मृत माशांचा खच!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध धरण जलाशयात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळून येत आहेत. जलाशयाच्या काठावर हजारो मृत मासे तरंगताना दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या जलाशयातून परिसरातील सुमारे ५० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे जलाशयातील पाणी दूषित झाल्यास हजारो नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवेगावबांध जलाशय हा सुमारे ३,००० एकर क्षेत्रफळाचा असून परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत मानला जातो.

मात्र गेल्या काही वर्षांत जलाशयाच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमित भागात बेकायदेशीरपणे भात शेती केली जात असल्याचे समोर आले आहे. या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याने पावसाचे पाणी किंवा शेतीतून वाहून जाणारे रासायनिक द्रव्य थेट जलाशयात मिसळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी प्रदूषित होत असून त्याचा परिणाम जलचरांवर दिसून येत आहे. नवेगावबांध जलाशयातून नळयोजनेद्वारे अजुर्नी मोरगाव तालुक्यातील जवळपास ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हेच पाणी गावातील घराघरांत पोहोचत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर या दूषित पाण्यामुळे कोणत्याहीगावात विषबाधा किंवा साथीचा रोग पसरला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *