मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील ग्राम एकोडी येथे मुख्य चौकात मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लिंबराज बालाजी रहांगडाले (वय ५० वर्ष, रा. बिड एकोडी) असे मृतकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, एकोडी गावातील पाण्याच्या टाकी जवळ तसेच मुख्य चौक व बसस्थानक परिसरात अचानक मधमाश्यांनी हल्ला चढविला.

हा परिसर नेहमीच नागरिकांच्या वर्दळीचा असल्याने अनेकजण या हल्ल्याच्या कक्षेत आले. यावेळी लिंबराज रहांगडाले हे अपंग व वयोवृद्ध असल्यामुळे स्वत:चा बचाव करू शकले नाहीत. मधमाश्यांच्या झुंडीने घेरल्याने ते प्रचंड घाबरले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात तारकेश रघुनाथ कोल्हे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच इतर काही नागरिकांनाही मधमाश्यांचा फटका बसला, मात्र त्यांनी वेळेवर सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरण नोंदविले आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *